जुलै-ऑगस्टबाबत प्रश्न : लाभार्थी चिंतेत
बेळगाव : मागील काही दिवसांपासून रखडलेल्या गृहलक्ष्मी योजनेचा जून महिन्याचा निधी डीबीटीद्वारे खात्यात वर्ग करण्यात आला आहे. काही लाभार्थ्यांना हा निधी मिळाला आहे. मात्र, अद्यापही बहुतांशी लाभार्थी निधीपासून वंचित असल्याचे बोलले जात आहे. शिवाय जूनचा निधी मिळाला, मात्र जुलै महिन्याचा कधी? असा प्रश्नही लाभार्थ्यांतून विचारला जात आहे. काँग्रेस सरकारने पाच गॅरंटी योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये गृहलक्ष्मी योजनेचा समावेश आहे. या योजनेंतर्गत कुटुंबातील प्रमुख महिलेला दरमहा दोन हजार रुपये दिले जातात. मात्र, मागील दोन-तीन महिन्यांपासून या योजनेतील निधी रखडला होता.
त्यामुळे लाभार्थ्यांतून योजनेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आता ऑगस्ट महिन्यात केवळ जून महिन्याचा निधी जमा करण्यात आला आहे. तोही काही लाभार्थ्यांनाच देण्यात आला आहे. उर्वरित लाभार्थ्यांना कधी मिळणार? शिवाय जुलै महिन्याच्या निधीचे काय? असा प्रश्नही पडू लागला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मे दरम्यान दोन महिन्यांचा निधी एकदाच जमा करण्यात आला होता. त्यानंतर जून, जुलै महिन्याचा निधी वेळेत जमा करण्याकडे दुर्लक्ष झाले होते. दरम्यान, लाभार्थ्यांतून उलटसुलट चर्चा केली जात होती. शिवाय दबक्या आवाजात योजना बंद पडल्याचेही बोलले जात होते. अखेर सरकारने आता जून महिन्याचा निधी देण्यास प्रारंभ केला आहे. मात्र, आता जुलै आणि ऑगस्टचा निधी वेळेत मिळणार की तोही लांबणीवर पडणार, याबाबत प्रश्न पडू लागला आहे.
अन्नभाग्य निधी रखडला
विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस सरकारने दहा किलो तांदूळ देण्याची गॅरंटी दिली होती. दरम्यान, तांदळाचा तुटवडा निर्माण झाल्याने त्याऐवजी प्रतिव्यक्ती 170 रुपये देण्याचे ठरले होते. मात्र, जून महिन्यापासून अन्नभाग्य योजनेंतर्गत मिळणारा हा निधीही रखडला आहे. केवळ महिन्याला केंद्र सरकारकडून मिळणारे धान्य मिळत आहे. मात्र, या योजनेतून मिळणारा निधी थांबला आहे.









