पावसाने मुंबईची तुंबई केली तरीही मुंबईकरांना तो हवा आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलशयांनीच तळ गाठला असतानाच मान्सूनचे आगमन झाले. जूनच्या अखेरच्या आठवड्यात मुसळधार पडून जून महिन्यातील संपूर्ण सरासरी गाठली. आता जुलै महिन्याचा मान्सून अंदाजही सकारात्मक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र रविवारपर्यंत मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांत 23 टक्केच पाणी साठा आहे. हा जलसाठा आगामी अडीच तीन महिने पुरेल असा अंदाज आहे. यातून वर्षभराच्या जलपुरवठ्याची चिंता आहेच.
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबई शहरात पावसाने जून महिन्यातील सरासरी गाठल्याचे चित्र होते. पावसाची आयत्यावेळी सरासरी गाठण्याची ही पहिली वेळ नाही. मात्र पाऊस सुऊ होईपर्यंत मुंबईकर हवालदिल झाला होता. जून महिन्यातील शहर आणि उपनगरातील सरासरी गाठण्यास 24 ते 30 जून या सात दिवसांत झालेल्या पावसाने सरासरी गाठण्यास मदत झाली. यावर भारतीय हवामानशास्त्र मुंबई विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी मुंबई शहरातील जून महिंन्यातील सरासरीवर माहिती दिली. नायर यांच्या मते मुंबई शहरातील जून महिन्यातील सरासरी 542.3 मिमी एवढी असताना शहरात 30 जूनपर्यंत 424.8 मिमी एवढा पाऊस झाला. म्हणजे 21.7 टक्क्यांनी घसरली आहे. तर उपनगरातील जून महिन्यातील पावसाची सरासरी ही 537.1 मिमी एवढी असताना 30 जूनपर्यंत उपनगरात तब्बल 549.6 मिमी एवढा पाऊस झाला. म्हणजे सरासरीच्या 2 टक्के अधिक पाऊस झाला. तीच स्थिती 29 जूनपर्यंतही होती. शहर परिसरात 1 ते 29 जून या कालावधीत 395 मिमी एवढा पाऊस झाला. यातील 24 ते 29 जून या सहा दिवसात 371.4 मिमी एवढा पाऊस झाला. तर उपनगरातील जून महिन्यातील पावसाची सरासरी 537.1 मिमी एवढी असताना 1 ते 29 जून या कालावधीत 502.9 मिमी एवढा पाऊस झाला. त्यापैकी 24 ते 29 जून दरम्यान 485 मिमी एवढा पाऊस झाला. ठाणे जिह्यातील जलसाठ्यांच्या तुलनेत मुंबईतील जलसाठ्यांच्या परिसरात पावसाची बऱ्यापैकी नोंद झाली. 24 जूनपासून सुऊ झालेल्या पावसाने ठाण्यातील जलसाठा परिसराच्या तुलनेत उपनगरातील जलसाठा परिसरात चांगला पाऊस झाला. यात विहार आणि तुलसी तलाव क्षेत्रात अनुक्रमे 159 आणि 265 मिमी एवढा पाऊस झाला. पावसाची नोंद ठाणे जिह्यातील जलसाठ्यांच्या परिसराच्या तुलनेत अधिक होती. तर वैतरणा 144.0 मिमी, तानसा 109 मिमी, अप्पर वैतरणा 122 मिमी, भातसा 137 मिमी तसेच मध्य वैतरणा 137 मिमी असा धरण क्षेत्रात पाऊस झाला. मुंबई शहरासाठी शनिवार आणि रविवार इशाऱ्याचे घोषित करण्यात आले होते. दरम्यान रविवारी मरिन ड्राइव्ह, गिरगाव, आणि दादर चौपाट्यांवर उत्फुल्ल फुललेल्या मुंबईकरांचे चेहरे बघायला मिळाले. येणार येणार म्हणत असताना अखेर पाऊस मुंबईत दाखल झाला.
यंदा मुंबईत मान्सून दाखल होत असताना दिल्लीचाही हात धरला होता. दोन्ही शहरात एकाच दिवशी दाखल होण्याचा योग 62 वर्षांनी जुळून आला होता. या पाऊस आगमनाची मुंबईकर विशेषत्वाने वाट पाहत होते. मान्सून दाखल होण्याच्या अधिकृत तारखा जाहिर होऊनही यावेळी मान्सूनचे आगमन होण्यास तसा विलंबच झाला. त्यात सिंधुदूर्ग-रत्नागिरी जिह्यात तब्बल 11 दिवस रेंगाळल्याने मुंबईकरांना पावसाची वाटच पहावी लागली होती. यामुळे शहरी भागातील मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे सारख्या शहरांवर चिंतेची गडद छाया पसरली होती. या शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांनी तळ गाठला आहे. अद्यापही पावसाच्या प्रमाणावर पुढील पिण्याच्या पाण्याची तजवीजीचा प्रश्न सुटेल अशी आशा करावी लागत आहे. हवामान विभागाकडून राज्यभर मान्सूनचे आगमन झाले असल्याची अधिकृत घोषणा केली. तरीही राज्यात मृग नक्षत्र कोरडेच गेले. त्यानंतरच्या नक्षत्राने बहर घेतला असल्याने पावसाची बरसात दिसून येत आहे. राज्यात पावसाची गरज शेती आणि पिण्यासाठी असली तरी शहरांमध्ये मात्र पिण्याच्या पाण्यावर कारखानदारी, उद्योगधंदेही विसंबून आहेत. जूनच्या अखेरच्या आठवड्यातील मुंबईतील पाऊसनोंद वाढत जाण्याचा सकारात्मक वातावरणीय बदल सध्या होत असल्याचे हवामान खात्याकडून दुजोरा देण्यात येत आहे. उशिरा का असेना पण मान्सूनचे अधिकृत आगमन हवामान विभागाला देखील सुखावून गेले आहे. अर्धा उलटून गेलेल्या जून पर्यंत पावसाबाबत वर्तविण्यात आलेले अंदाज चुकीचे ठरत असले तरी हवामान विभागाच्या प्रत्येक अंदाजाकडे मुंबईकरांचे लक्ष होते. तळ गाठलेल्या जलाशयांमधील जलसाठा चिंतनीय होता. अशा वेळी शिलकीचा जलसाठा वापरण्याचे आदेश काढले जातात. एखाद्या वर्षातील महिन्यात पावसाने ओढ खाल्यास मुंबई, ठाणे परिसरातच पाऊस नसल्याने जलाशयांमध्ये देखील खडखडाटाची स्थिती निर्माण होते. तानसा, अप्पर वैतरणा, भातसा ही क्षेत्रफळाने मोठी असली तरी देखील मुंबई उपनगरांमध्ये असलेली विहार, तुळशी सारख्या तलावांना देखील मर्यादा आहेत. त्यामुळेच तलावक्षेत्रातील पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्यास किमान पिण्याच्या पाण्याची चिंता नसते. त्यामुळेच वाढणाऱ्या शहरांना पावसाच्या आगमनाची उत्सुकता असते.
जुलै महिन्यातही समाधानकारकचा अंदाज : जुलै महिन्यात देशातील मासिक अंदाजानुसार पाऊस सामान्य राहणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी मत मांडले. तसेच बहुधा सामान्याच्या सकारात्मक बाजूने असेल. मध्य भारत आणि लगतच्या दक्षिण व्दिपकल्प तसेच पूर्व भारत आणि ईशान्य भारत वायव्य भारताच्या काही भागात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम, ईशान्य आणि आग्नेय व्दीपकल्पीय भारतातील अनेक भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान पाऊस प्रमाण पाहिल्यास दर अडीच ते तीन वर्षांनी दुष्काळ स्थिती निर्माण होण्यास कारणीभूत पावसाचे कमी होणारे प्रमाण आहे. बरे हे ठराविक काळानंतर सातत्याने घडत असूनही त्यासाठी आपण पुरेसे गंभीर नसल्याचेच समोर येत आहे. रविवारपर्यंत मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांत 23 टक्केच पाणी साठा असल्याचे सांगण्यात आले. हा जलसाठा आगामी अडीच तीन महिने पुरेल असा अंदाज आहे. मात्र यातून वर्षभराच्या जलपुरवठ्याची चिंता आहेच. मान्सूनच्या अंदाजावर शेती, व्यवसाय, कारखानदारी एकंदरीत मानवी जीवनमान अवलंबून असते. अंदाजानुसार पाऊस झाल्यास पावसाचे नियोजन करण्यास प्रशासन, सरकारला वेळ आणि योजना सुचतील.
राम खांदारे








