प्रतिनिधी,कोल्हापूर
बावीसशेहून अधिक वर्षांचा जिता-जागता वारसा असलेल्या ब्रह्मपुरीच्या भूभागावर वसलेल्या जुना बुधवार पेठेचा शब्दबद्ध केलेला इतिहास आता पुस्तकरूपाने जनमाणसांसमोर येत आहे. ओळख जुना बुधवार पेठेची असे या पुस्तकाचे नाव आहे.प्रा.दिनेश डांगे यांनी हे पुस्तक लिहिले आहे.या पुस्तकातून पेठेचा सामाजिक,सांस्कृतिक,कला,क्रीडा परंपरा व ती वृद्धींगत करण्यासाठी पेठवासियांनी दिलेले योगदान उजेडात येणार आहे.येत्या बुधवार 13 रोजी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आहे.जुना बुधवार पेठेतील अभिषेक लॉन हॉलमध्ये सायंकाळी 5 वाजता हा सोहळा होईल, अशी माहिती तालमीचे अध्यक्ष रणजित शिंदे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
अधिक माहिती देताना शिंदे म्हणाले,ओळख जुना बुधवार पेठेची या पुस्तकाकडे आम्ही जुना बुधवार पेठेची अस्मिता म्हणून पाहतोय.पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत शाहू छत्रपती,आमदार जयश्री जाधव,राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर व माजी आमदार मालोजीराजे छत्रपती आदी उपस्थित राहणार आहेत.पेठेच्या इतिहासावर पुस्तक बनवणारी जुना बुधवार पेठ ही कोल्हापुरातील पहिली पेठ आहे.पेठेत अनेक दशकांपासून हिंदू,मुस्लिम,ख्रिश्चन,जैन धर्मीय गुण्यागोविंदाने राहत आहेत.सामाजिक,सांस्कृतिक,कला, क्रीडा परंपराही पेठेने अगदी मनापासून जपली आहे. या परंपरेची माहिती तालीमचे संचालक प्रविण हुबाळे, श्रीधर निकम,विराज पाटील,राधिका वरेकर,सत्यजित आवटे व (कै.) प्रकाश शिंदे यांनी दहा वर्षांपूर्वी संकलित केली होती.काही महिन्यांपूर्वी याच सर्वांनी आपल्याकडील माहितीचे पुस्तक बनवण्यासाठी संकल्पना जुना बुधवार तालमीच्या ज्येष्ठांसमोर मांडली.त्यांनी खुल्या मनाने होकार देत पुस्तक निर्मितीसाठी सहकार्याची भावना व्यक्त केली.
शिंदे पुढे म्हणाले की, प्रविण हुबाळे व सहकाऱ्यांनी पुस्तकाच्या निर्मितीसाठी ज्येष्ठ लेखक प्रा.दिनेश डांगे यांच्याशी चर्चा केली.यातून पुस्तकांमध्ये जुना बुधवार पेठेची जुनी आणि खरी माहिती ठळकपणे मांडण्यासाठी प्रकरणे तयार केली.या प्रकरणांमधून कोल्हापूरचा गौरवशाली इतिहास,जुना बुधवार पेठेचा इतिहास,पेठेला जुना बुधवार पेठ असे नाव का दिले,अशी आहे आमची पेठ, शतकोत्तर अमृतमहोत्सवी जुना बुधवार तालीम,शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी शिपुगडे तालीम,जुना बुधवार पेठेला राजर्षी शाहू महाराजांचा लाभलेला वरदहस्त,गणेशोत्सव व पेठेतील श्रद्धास्थाने यांची माहिती मांडली आहे.याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करून पेठेतील नवरत्ने आणि अभिमान बनून लोकांच्या हृदयात स्थान मिळवलेले गणपत बापूजी पोवार,गंगाराम कांबळे,दत्तोबा दळवी,दादासाहेब शिर्के,दादासाहेब हळदकर,जयाबाई हवीरे,जयसिंगराव दळवी, शामराव साळोखे,रामनाथ जठार,विठाबाई काळे (परिवर्तनवादी झुंजार कार्यकर्त्या),समतावादी जलसा मंडळाचे संस्थापक यशवंतराव सुळगावकर,शिल्पकार बाळ चव्हाण, क्रांतीकारक अभिमन्यू कदम,अमेरिकेला गेलेला पहिला युवक : प्रभाकर वरुटे, प्रिटींग मशीन्सचे उत्पादक लक्ष्मण बजाजी शिंदे, पैलवान आनंदराव डांगे,फेटाबहाद्दर विश्वनाथ ठोंबरे, सामाजिक कार्यकर्ता :खलील पन्हाळकर, सूरपती पाडुरंग सुतार, चित्रकार भीमराव यादव,माजी नगरसेवक बाबुराव मुळीक,लावण्यवती माया जाधव आदींची माहितीही पुस्तकात समाविष्ट आहे. याचबरोबर पेठेतील हुतात्मा शंकरराव तोरस्कर,पेठेचा पोवाडा,स्मशानभूमीसह बंगडे यांचा नावेचा कारखाना,तोरस्कर चौकातील नावेचा कारखाना,बेकरीची पेठ जुना बुधवार पेठ, मी शिवाजी पूल बोलतोय याचीही माहिती पुस्तकातून वाचायला मिळणार आहे,असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला जुना बुधवार तालीमचे सचिव सुनील शिंदे,ऑडीटर विराज पाटील, संचालक सुशील भांदीगरे, राधिका वरेकर,श्रीधर निकम आदी उपस्थित होते.









