समारोप सोहळ्यात टॉम क्रूझची स्टंटबाजी
वृत्तसंस्था/ पॅरिस
रविवारी रात्री उशिरा फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये तीन तास चाललेल्या समारोप समारंभात ऑलिम्पिक खेळांची सांगता झाली. या सोहळ्याची सुरुवात फ्रान्सच्या राष्ट्रगीताने आणि अमेरिकेच्या राष्ट्रगीताने समाप्त झाली. 2028 च्या ऑलिम्पिकचे आयोजन अमेरिका (लॉस एंजल्स सिटी) करणार आहे, यामुळे हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझ आणि रॅपर स्नूप डॉग अमेरिकेचे प्रतिनिधित्व करताना दिसले. भव्य दिव्य अशा सांगता समारंभात टॉम क्रूझने आपला जलवा दाखवताना 160 फुटांवरुन उडी मारली, बाईकसह विमानात चढला व उंच टेकडीवर हॉलीवूड सिटी असलेल्या लॉस एंजल्स शहराचा ध्वज फडकावला.
पॅरिस ऑलिम्पिकचा रविवारी (11 ऑगस्ट) समारोप झाला. समारोप समारंभात हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझने नेत्रदीपक परफॉर्म केले. त्याने आपल्या अप्रतिम स्टंटने सर्वांनाच चकित करुन टाकले. विशेष म्हणजे, त्याचे सर्व स्टंट हॉलिवूडवर आधारित होते. चित्रपटांमध्ये आपल्या खऱ्याखुऱ्या स्टंटबाजीसाठी प्रसिद्ध असलेला सुपरस्टार टॉम क्रूझ सर्वप्रथम स्टेडियमच्या छतावर पोहोचला. तिथून त्याने खाली उडी मारली. त्याचा हा स्टंट पाहून स्टेडियममध्ये उपस्थित असलेले सगळेच आश्चर्यचकित झाले होते. यानंतर टॉमने दुचाकीवरुन पॅरिसच्या रस्त्यावर फेरफटका मारला. त्यानंतर क्रूझ चक्क बाईकसह विमानात चढला, जे त्याला थेट एका टेकडीवर घेऊन गेले. टॉमच्या या परफॉर्मन्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. पुढील ऑलिम्पिकचे आयोजन अमेरिकातील लॉस एंजल्स शहरात होणार आहे. 14 जुलै ते 30 जुलै 2028 दरम्यान हे खेळ आयोजित केले जातील. विशेष म्हणजे, लॉस एंजल्सने यापूर्वी 1932 आणि 1984 मध्ये ऑलिम्पिकचे आयोजन केले आहे.









