मगर हा भूजलचर प्राणी नुसता पाहिला तरी भीतीने थरकाप उडतो याची सर्वांना कल्पना आहे. हा प्राणी कधीही माणसाळत नाही. उलट माणूस हे त्याचे भक्ष्य आहे. त्यामुळे माणूस आवाक्यात आला की तो त्याच्यावर पाण्यातून झेप घेतो आणि त्याला आपली शिकार बनवितो. मगरीने माणसाचा बळी घेतल्याच्या अनेक घटना आजवर घडल्या आहेत. अधून मधून त्या घडतच असतात.

पण अशा भयंकर मगरींनी भरलेल्या तलावात उडी घेणे आणि तीही एका कोवळ्या वयाच्या मुलाने, हे दृष्य आपण कल्पनेतही डोळ्यासमोर आणू शकणार नाही. तथापि, तसे घडले आहे. अर्थात या तलावात मोठ्या मगरी नव्हत्या, तर त्यांची पिल्ले होती. मात्र, ती मगरींचीच पिल्ले असल्याने कमी धोकादायक नव्हती. तरीही या मुलाने धाडसाने त्यांच्यात उडी मारली आणि वेगाने पोहत त्याने तलावाचे पलिकडचे टोक सुखरुपरित्या गाठले. सध्या हा व्हिडीओ प्रसारित करण्यात येत असून कित्येकजणांना तो अविश्वसनीय वाटत आहे. पण तो खरा असल्याचे चाचणीतून दिसून आले असून लाखो लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. उडी मारणाऱ्या मुलाचे वय आणि शरीरयष्टी पाहता मगरींची पिलेही मोठी वाटावीत असे स्थिती दिसून येते. मात्र, या मुलाच्या साहसाचे एका बाजूला कौतुक होत असले तरी अनेकजण त्याने हा धोका पत्करावयास नको होता. त्याच्या आईवडिलांनी किंवा तलावाच्या व्यवस्थापनाने त्याला अनुमती कशी दिली असाही प्रश्न विचारत आहेत. या व्हिडीओला लाखो दर्शक मिळाले आहेत.









