हैद्राबाद येथील ही घटना आहे. 11 जानेवारीच्या रात्री एका इमारतीच्या तिसऱया मजल्यावर असणाऱया फ्लॅटमध्ये डिलीव्हरी देण्यासाठी एक डिलिव्हरी बॉय गेला होता. तो पदार्थांची डिलिव्हरी घेऊन त्या घरी गेला आणि त्याने बेल वाजविली. घराचा दरवाजा उघण्यात आला. हा कर्मचारी आत आल्याबरोबर कोणाच्याही ध्यानीमनी नसताना घरात आसणाऱया जर्मन शेफर्ड जातीच्या कुत्र्याने या डिलिव्हरी बॉयवर झडप घातली. युवकाने घाबरुन घराबाहेर पळ काढला पण कुत्र्याने त्याचा पाठलाग केला. घाईगडबडीने तो दुसऱया बाजूला असणाऱया एका दरवाजातून बाल्कनीत पोहचला. मात्र कुत्रा तेथेही येऊन पोहचल्याने त्याची पाचावर धारण बसली. हा कुत्रा आता आपल्याला सोडत नाही, अशी त्याची भावना झाली.
कुत्र्यापासून स्वतःची सुटका करुन घेण्यासाठी त्याने तिसऱया मजल्यावरुन खाली जमीनवर उडी मारली. या प्रयत्नांमध्ये त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली. तो अद्यापही शुद्धीवर आलेला नाही. त्याच्यावर उपचारांचा परिणाम हे संशोधनाचे विषय आहेत. या डिलिव्हरी बॉयचे नाव रिझवान युसूफ असे आहे. ज्या घरात हा प्रकार घडला ते शोभना नामक महिलेचे आहे. आता हे प्रकरण न्यायालयात पोहचले आहे. शोभना यांच्या म्हणण्यानुसार रिझवानने प्रथम कुत्र्याची कळ काढली. कुत्र्याने प्रतिक्रिया म्हणून त्याच्यावर हल्ला केला. यात कुत्र्याची चूक नाही. आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर काहीही भाष्य करता येणार नाही.









