लाखो पर्यटक सांस्कृतिक नगरीत दाखल : जय्यत तयारी
प्रतिनिधी/ बेंगळूर
मागील दहा दिवसांपासून सुरू असलेल्या ऐतिहासिक म्हैसूर दसरोत्सवातील प्रमुख आकर्षण असलेला जम्बो सवारी गुरुवारी थाटात संपन्न होणार आहे. जम्बो सवारीसाठी जय्यत तयारी करण्यात आली असून म्हैसूरनगरीत लाखो पर्यटक दाखल झाले आहेत. सायंकाळी मशाल कसरतीने म्हैसूर दसरोत्सवाची सांगता होणार आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे दुपारी 1 ते 1:18 दरम्यान शुभ धनुरलग्न मुहूर्तावर म्हैसूर राजवाडा आवारातील कोटे अंजनेय मंदिराजवळ नंदीध्वजाची पूजा करतील. त्यानंतर सायंकाळी 4:42 ते 5:06 दरम्यान शुभ कुंभ लग्न मुहूर्तावर जम्बो सवारीला प्रारंभ होईल. यावेळी अभिमन्यू हत्तीच्या पाठीवर सुवर्ण अंबारीत विराजमान चामुंडेश्वरी देवीच्या मूर्तीवर पुष्पार्चन करून सिद्धरामय्या जम्बो सवारीला चालना देतील.
जम्बो सवारीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारचे 60 चित्ररथ, कलापथके, पोलीस पथक, अश्वदल, पोलीस बॅण्ड, मंगलवाद्यांसह जम्बो सवारी मार्गस्थ होणार आहे. यंदा प्रथमच मिरवणुकीत नंदीध्वज फिरविला जाणार आहे. अभिमन्यू हत्तीला सहाव्यांदा तब्बल 750 किलो वजनाची सुवर्णअंबारी पाठीवर वाहून नेण्याचा मान मिळाला आहे. त्याच्यामागोमाग इतर हत्तीही जम्बो सवारीत सामील होत आहेत. मागील दीड महिन्यांपासून या हत्तींकडून सराव करून घेण्यात आला आहे.
आसनक्यवस्थेत कपात
चेंगराचेंगरीची घटना घडू नये यासाठी प्रेक्षकांच्या आसन क्षमतेत मोठी कपात करण्यात आली आहे. राजवाडा आवारात यंदा 45 हजार प्रेक्षकासाठी आसनव्यवस्था करण्यात आली आहे. गोल्ड कार्ड तिकीटे आणि पास मिळवलेल्यांसाठी स्वतंत्र आसनव्यवस्था करण्यात आली आहे.
सुरक्षेसाठी खबरदारी उपाययोजना
जम्बो सवारीवेळी कोणत्याही अनुचित घटना घडू नयेत यासाठी म्हैसूर जिल्हा प्रशासन व शहर पोलिसांनी खबरदारीचे उपाय केले आहेत. जम्बो सवारी मार्गावर जुन्या व जीर्ण इमारतींवर, झाडांवर चढून जम्बो सवारी पाहण्यापासून नागरिकांना रोखले जाणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने 36,384 सिव्हील आणि वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. 35 केएसआरपी तुकड्या, 15 सीएआर व डीएआर तुकड्या, 29 एएससी, एक गरुड कमांडो पथक व 1500 गृहरक्षक दलाचे जवात सुरक्षेसाठी नेमण्यात आले आहे. त्यांच्यासोबत 35 डीवायएसपी, 140 पोलीस निरीक्षक देखील सुरक्षाकार्यात सहभागी होतील. जम्बो सवारी मार्गावर पोलीस दलाने 220 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.









