पुणे / वार्ताहर :
कोविड काळात शिवाजीनगरमध्ये उभारलेल्या कोविड सेंटरचे कॉन्ट्रक्ट संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर यांच्याकडे होते. त्यांच्या कंपनीला ब्लॅकलिस्टेड करून देखील त्याच्यावर तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे पीएमआरडीए आयुक्त आणि पुणे महानगर पालिका आयुक्तांनी याविषयी तात्काळ गुन्हा दाखल करावा, अन्यथा मी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करेन, असा पवित्रा भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा घेतला.
किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर पुणे मनपात झालेल्या हल्ल्याच्या अनुषंगाने गुरुवारी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याशी चर्चा केली. याप्रकरणात 28 जणांची ओळख पटली असून, आणखी 7 जणांचा पोलीस शोध घेत आहेत. या 35 गुंडावर कारवाई होणार, असा विश्वास सोमय्या यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्या आमदारांची चौकशी होती त्यांच्यावरील चौकशीबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांच्यावरील न्यायालयीन प्रक्रीया सुरू आहे. त्या प्रक्रीयेत मी बोलणे चुकीचे असल्याचे सोमय्या म्हणाले.
पुढे ते म्हणाले, कोयता गँगच्या अनुषंगाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. या चर्चेनंतर विशेष कृती योजना तयार केली जात आहे. पुणे पोलिसांना गरज भासल्यास त्यांच्या मदतीला महाराष्ट्र पोलीस देखील उभी राहील.
महागाईचे कारण भ्रष्टाचार
महागाई संदर्भात सरकार चिंतेत असून, पावले उचलत आहे. महागाईचे कारण भ्रष्टाचार आहे. तसेच रशिया-युक्रेन युद्धामुळे पेट्रोलियम पदार्थाचे भाव अन्य देशात वाढले असले तरी नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे इतर देशात भाव 250 रूपये असताना आपण भाव स्थिर ठेऊ शकल्याचे सोमय्या म्हणाले.








