268 गाळय़ांसाठी 6 मे पासून होणार लिलाव प्रक्रिया
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळय़ांच्या माध्यमातून महसूल मिळतो. पण शहरातील गाळय़ांच्या कराराची मुदत संपुष्टात आल्याने ते नव्याने भाडे कराराने देण्यात येणार आहेत. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच 268 गाळे भाडे कराराने देण्यासाठी लिलाव आयोजित करण्यात आला आहे. महात्मा फुले भाजीमार्केटमधील 59 गाळय़ांसाठी दुसऱयांदा लिलाव होणार आहे.
महापालिकेच्या मालकीचे व्यापारी संकुल असून 440 गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. मात्र काही गाळय़ांच्या कराराची मुदत यापूर्वीच संपुष्टात आली आहे. तसेच काही ठिकाणी नव्याने गाळय़ांची उभारणी करण्यात आली आहे. कसाई गल्ली येथील फिश मार्केट आणि कोनवाळ गल्लीतील मटण मार्केट, सरदार मैदानावरील क्रीडासंकुलातील व्यापारी गाळे, महात्मा फुले मार्केट, गणपत गल्ली, चव्हाट गल्ली, किर्लोस्कर रोड, हिंदवाडी, खंजर गल्ली, मध्यवर्ती बसस्थानकासमोरील व्यापारी संकुल, सीबीटीजवळील मिनी मार्केट, जुना धारवाड रोड स्क्रॅप मार्केट, अनगोळ नाका व महापालिका जुने कार्यालय आवारातील क्यापारी गाळय़ांचा समावेश आहे. फिश मार्केटची इमारत नव्याने बांधण्यात आली असून येथील गाळय़ांचा लिलाव आयोजित करण्यात आला आहे. तसेच कसाई गल्लीमधील कत्तलखाना व बकऱयांचे शेड भाडय़ाने देण्यात येणार आहे. तसेच कोनवाळ गल्ली येथील कत्तलखाना व बकऱयांचे शेड भाडेतत्त्वावर देण्यासाठी तिसऱयांदा लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत नेहरूनगर येथील केपीटीसीएल कार्यालयाशेजारी नव्याने 14 गाळे उभारण्यात आले आहेत. यापैकी बारा गाळय़ांचा लिलाव यापूर्वी करण्यात आला होता. आता उर्वरित दोन गाळय़ांचा लिलाव करण्यात येणार आहे. तसेच शहर व उपनगरात स्मार्ट बसथांब्याची उभारणी करण्यात आली असून, ठिकठिकाणी सहा बाय आठ फूट आकाराचे दहा किओस्क गाळे उभारण्यात आले आहेत. यापैकी 8 गाळे 12 वर्षांच्या भाडे कराराने देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, फेरलिलाव आयोजित करण्यात आला आहे. दि. 6 मे पासून लिलाव प्रक्रियेला प्रारंभ होणार असून तो सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत महापालिकेच्या मुख्य कार्यालयात चालणार आहे. लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी गाळय़ाची अनामत रक्कम जमा करणे बंधनकारक आहे.
लक्ष्मी मार्केटमधील गाळे भाडेतत्त्वावर देण्याचा मार्ग मोकळा
खंजर गल्ली येथील लक्ष्मी मार्केटमधील गाळे भाडेतत्त्वावर देण्यास काही भाडेकरूंनी आक्षेप घेऊन स्थानिक न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे येथील गाळे भाडेतत्त्वावर देण्यास स्थगिती देण्यात आली होती. मात्र सदर गाळे भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया राबविण्यासह तक्रारदारांना लिलाव प्रक्रियेत भाग घेण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.
महापालिकेच्यावतीने खंजर गल्ली येथील लक्ष्मी मार्केटमधील जुने गाळे हटवून नवीन गाळे तसेच दुचाकी आणि चार चाकी वाहनांसाठी पार्किंगतळाची उभारणी केली आहे. सदर पार्किंगतळ खुले करावे आणि येथील गाळे भाडेतत्वावर देण्यात यावे अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. येथील गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी महापालिकेने लिलाव प्रक्रिया राबविली होती. मात्र येथील जुन्या भाडेकरूंनी न्यायालयात धाव घेऊन लिलाव प्रक्रिया राबविण्यास आक्षेप घेतला होता. तसेच या गाळय़ांचा ताबा आपल्याकडे असल्याचा दावा करून लिलाव प्रक्रिया राबवू नये अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यामुळे लिलाव प्रक्रिया राबविण्यास स्थानिक न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली होती.
मात्र सदर गाळय़ांचा ताबा महापालिकेकडे असून, येथे नवीन गाळय़ांची उभारणी केली आहे. त्यामुळे स्थगिती मागे घेऊन लिलाव प्रक्रिया राबविण्यास परवानगी द्यावी, असा युक्तिवाद महापालिकेच्या वतीने न्यायालयात करण्यात आला होता. त्यामुळे न्यायालयाने लिलाव प्रक्रिया राबविण्यास महापालिकेला परवानगी दिली आहे. तसेच गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी राबविण्यात येणाऱया लिलाव प्रक्रियेत तक्रारदारांनाही सहभागी होण्याची मुभा देण्यात यावी, असा आदेश न्यायालयाने बजावला आहे.









