जगात सरासरी 17 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
3 जुलै हा जगातील सर्वात उष्ण दिवस ठरला आहे. तसेच जून महिना आतापर्यंतचा जगातील सर्वात उष्ण जून महिना ठरला आहे. युएस नॅशनल सेंटर्स फॉर एन्व्हायर्नमेंटल प्रिडिक्शननुसार 3 जुलै रोजी सरासरी जागतिक तापमान 17 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदले गेले. यापूर्वी ऑगस्ट 2016 मध्ये 16.92 अंश सेल्सिअस इतक्या सरासरी तापमानानंतर सर्वात उष्ण दिवसाची नोंद झाली होती.
भारतात सध्या पावसाळी वातावरणामुळे तापमानात घट झालेली असली तरी अन्य बऱ्याच देशांमध्ये उष्णतेचा पारा वाढलेला आहे. स्पेन आणि आशियातील अनेक देशांमध्ये विक्रमी उष्णतेनंतर उत्तर समुद्रासारख्या अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. या आठवड्यात चीनमध्येही उष्णतेची लाट आली असून तापमान 35 अंश सेल्सिअसच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहे. दक्षिण अमेरिकेतही उष्णता वाढीमुळे उच्च तापमानाची नोंद झाली आहे.
या वर्षाच्या सुऊवातीपासूनच संशोधकांनी जमीन आणि समुद्रातील वाढत्या तापमानाबाबत चिंता व्यक्त केली जात होती. अल-निनो आणि वातावरणातील कार्बन डायऑक्साईड (सीओ2) वाढल्यामुळे तापमानवाढीचा सामना करावा लागत असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. तसेच मानवी क्रियाकलाप हेदेखील तापमान वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे. जीवाश्म इंधन जाळल्याने दरवषी 40 अब्ज टन कार्बन डायऑक्साईड तयार होते. अशीच परिस्थिती राहिल्यास लवकरच हा विक्रमही मोडीत निघेल, असा दावा केला जात आहे.









