चार मुला–मुलींना अफलातून कामगिरी करत 2 सुवर्ण व 2 कांस्य पदकाची कमाई केली
कोल्हापूर : अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या सीबीएसई शालेय पश्चिम विभागीय ज्युदो स्पर्धेत कोल्हापुरातील चार मुला–मुलींना अफलातून कामगिरी करत 2 सुवर्ण व 2 कांस्य पदकाची कमाई केली. स्पर्धेतून सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंची गंगानगर (राजस्थान) येथे आगामी काळात आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, मोठ्या स्वरुपात आयोजित केलेल्या या सीबीएसई शालेय पश्चिम विभागीय ज्युदो स्पर्धेत सीबीएसई शाळांमधील शेकडो मुला–मुलींना प्रतिनिधीत्व केले. कोल्हापुरातील शांतीनिकेतन स्कूलच्या शाल्वी प्रणव देसुरकरने 19 वर्षाखालील मुलींच्या 70 किलो वजनावरील गटातून स्पर्धेत प्रतिनिधीत्व करत सुवर्ण पदक जिंकले.
सलग पाच सामने जिंकुन आगेकुच केलेल्या शाल्वीने अंतिम फेरीत बेंगळूरमधील सीबीएसई शाळेतील मुलीला पराभूत करत सुवर्ण पदक प्राप्त केले. शाल्वीच्या पावलावर पाऊल टाकत विग्बोर इंटरनॅशनल स्कूलने क्रीश मुकंदननेही 17 वर्षाखालील मुलांच्या 73 किलो खालील गटात सुवर्ण पदक आपल्याकडे खेचून आणले.
क्रीशनेही सलग पाच सामन्यात विजय मिळवत आगेकुच करताना स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईतील सीबीएसई शाळेतील मुलाला पराभवाचा धक्का देत सुवर्णपदकावर कब्जा केला. याचबरोबर स्पर्धेतील 12 वर्षाखालील मुलांच्या 30 किलो वजन गटात पार्थ पाटीलने तर 14 वर्षाखालील मुलींच्या 44 किलो वजन गटात लावण्या पाटीलने कांस्य पदक पटकावले.
पार्थ हा विग्बोर इंटरनॅशनल स्कूलमध्ये तर लावण्याही संजीवन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकत आहेत. विद्यार्थ्यांना केंद्राचे अध्यक्ष लालासाहेब गायकवाड, शरद पोवार, आकाश चिले यांचे मार्गदर्शन लाभत आहे.








