आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांची विधानपरिषदेत घोषणा : दोषींवर कडक कारवाई करणार
बेळगाव : बेळगावसह राज्यातील वेगवेगळ्या सरकारी इस्पितळात झालेल्या बाळ-बाळंतिणींच्या मृत्यू प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने तयारी दर्शवली आहे. आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री दिनेश गुंडूराव यांनी गुरुवारी विधानपरिषदेत यासंबंधीची घोषणा केली असून या प्रकरणातील दोषींना अद्दल घडविल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. गुरुवारी बाळंतिणींच्या मृत्यू प्रकरणाबद्दल विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना हे प्रकरण गंभीर आहे. सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला आहे. बळ्ळारी येथील सरकारी इस्पितळात बाळंतिणींचा मृत्यू झाल्यानंतर लगेच आपण बळ्ळारीला पथक पाठवून ज्या सलाईनच्या वापरामुळे बाळंतिणींना थंडी येत होती, ते रिंगर
लॅक्टेट तपासणीसाठी लॅबला पाठवण्यात आले. कर्नाटकातील लॅबमधील अहवाल हा सलाईन वापरास योग्य नाही, असा आला. तर सेंट्रल ड्रग्ज लॅबमधील अहवाल वेगळा आला. सलाईन उत्तम दर्जाचे असल्याचा तो अहवाल होता. त्यामुळे आम्हीही गोंधळात आहोत. या सलाईनचे 192 बॅच गोठवण्यात आल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. जर त्या बाळंतिणींचा मृत्यू वैद्यकीय कारणामुळे झाला असेल तर त्याला कोणी काही करू शकत नाही. चुकीच्या औषधामुळे, दुर्लक्षपणामुळे झाला असेल तर हा मुद्दा गंभीर आहे. केवळ बळ्ळारीच नव्हे, बेळगावसह राज्यातील वेगवेगळ्या सरकारी इस्पितळात झालेल्या बाळंतिणींच्या मृत्यू प्रकरणाचा माहिती जमवण्यात येत असून यासंबंधी ऑडिट करण्यात येत आहे. औषध लॉबी फार मोठी आहे. तरीही संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.









