विरोधी पक्षनेते युरी आलेमांव बनले आक्रमक
जमीन घोटाळ्यातील प्रमुख आरोपी सुलेमान सिद्दीकी खान पलायन प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी तसेच राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी त्याची गंभीर दखल घेऊन हस्तक्षेप करावा तसेच सुलेमानने व्हिडिओतून आरोप केलेल्या पोलिसांना निलंबित करावे, अशा विविध मागण्या काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आल्या आहेत. चोर, पोलिस, राजकारण्यांचे गुंडाराज गोव्यात चालू आहे, असा घणाघाती आरोपही करण्यात आला आहे.
विरोधी पक्षनेते युरी आलेमांव, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी काल सोमवारी पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत वरील मागण्या करण्यात आल्या. सिद्दीकी प्रकरणामुळे गृहखाते, पोलिसदल बदनाम झाले असून कायदा सुव्यवस्थेचे बारा वाजले आहेत. सर्वसामान्य जनतेचा पोलिस खात्यावरील विश्वास राहिलेला नाही. विविध गुह्यात सहभागी असलेला आरोपी आरामात पळून जातो आणि त्यासाठी पोलिसच मदत करतात, असे एकंदरित चित्र दिसून येत आहे.
सुलेमानला कॉन्स्टेबल अमित नाईक याने आरामात पोलिस कोठडीतून बाहेर काढले. त्यामागे अनेकांचा हात असल्याचा संशय काँग्रेस नेत्यांनी वर्तवला आहे. हे पलायन जितके धक्कादायक आहे तितकाच धक्कादायक सुलेमानचा व्हिडिओ असून त्याने तर पोलिस अधिकारी, राजकारणी यांची नावे स्पष्टपणे घेतल्यामुळे चोर, पोलिस, राजकारण्यांचे लागेबांधे असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे पलायन म्हणजे त्याचा मोठा पुरावा असून न्यायालयीन चौकशीतूनच खरे सत्य बाहेर येणार असल्याचे काँग्रेस नेत्यांनी नमूद केले. पोलिसदलातील या अपयशामुळे त्यांच्याच अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. गोव्यात अशा प्रकारे ‘गुंडाराज’ चालू असल्याची टीकाही त्यांनी केली.









