वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनामुळे लडाखमध्ये उसळलेल्या हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयानचे निवृत्त न्यायाधीश बी. एस. चौहान यांच्याकडे ही चौकशी करणाऱ्या समितीचे नेतृत्व देण्यात आले आहे. हा हिंसाचार का झाला? कोणी घडविला? आणि या हिंसाचाराचा सूत्रधार कोण? हे सर्व शोधण्याचे उत्तरदायित्व या समितीवर सोपविण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृह विभागाकडून देण्यात आली आहे.
या समितीत निवृत्त न्यायाधीश चौहान यांना साहाय्य करण्यासाठी निवृत्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मोहनसिंग परिहार आणि तुषार आनंद या आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. लडाख या केंद्रशासित प्रदेशाचा पोलीस विभाग आणि मुख्य सचिव यांना चौकशी समितीला आवश्यक ते सर्व सहकार्य आणि साधने पुरविण्याचा आदेशही केंद्र सरकारकडून दिला गेला आहे.
घटना काय आहे…
लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी लडाख संबंधी समस्यांच्या संदर्भात उपोषण केले होते. त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जनमत बनविण्याचा प्रयत्न या उपोषणाच्या माध्यमातून केला. त्यांनी केलेल्या काही प्रक्षोभक वक्तव्यांमुळे त्यांच्या उपोषणस्थळी जमलेला जमाव हिंसक झाला. 25 सप्टेंबरला या जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार केला. तरीही जमावाने हिंसक कृत्ये करणे न थांबविल्याने पोलिसांनी गोळीबार करावा लागला. त्यात चार जणांचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही पोहचले असून प्राथमिक सुनावणी झाली आहे. वांगचुक यांनीही न्यायालयीन चौकशीची मागणी केली होती.









