15 हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ झाली होती अटक
बेळगाव : एकाच गावातील एका अंगणवाडीतून दुसऱ्या अंगणवाडी केंद्रात बदली करण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाच घेताना गुरुवारी सकाळी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी महिला व बालकल्याण खात्याच्या दोघा अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडले होते. त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. कणगला (ता. हुक्केरी) येथील अंगणवाडी साहाय्यिका शकुंतला मारुती कांबळे यांना कणगला येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक 215 मधून 384 केंद्रावर बदली करून घ्यायची होती. त्यासाठी कॉम्प्युटर ऑपरेटर शशिकला पांडुरंग बडीगेर (वय 38) आणि कार्यालयीन अधीक्षक आर. ए. होन्नूर वली (वय 39) यांनी पंधरा हजार रुपयांची लाच मागितली होती. गुरुवार दि. 22 मे रोजी सकाळी लाच घेताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. लोकायुक्त पोलीस निरीक्षक वेंकटेश यडहळ्ळी, एल. एस. होसमनी, बी. बी. हुद्दार, शशिकुमार देवरमनी, गिरीश पाटील, फातिमा अलीखानवर, धनंजय नायक आदींचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली होती. या दोघा जणांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशावरून चौदा दिवसांसाठी त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. शकुंतला कांबळे या अंगणवाडी साहाय्यिकेकडे बदलीसाठी 30 हजार रुपयांची मागणी केली होती. शेवटी 15 हजाराला व्यवहार ठरला होता.









