वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तामिळनाडूचे वादग्रस्त मंत्री सेंथिल बालाजी यांच्या जामिनासंबंधीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सुरक्षित ठेवला आहे. बालाजी यांना भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यांची अटक मद्रास उच्च न्यायालयाने वैध ठरविली होती. या निर्णयाविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.
बालाजी यांच्या पत्नी मंगला याही भ्रष्टाचार प्रकरणात आरोपी आहेत. ज्येष्ठ विधीज्ञ मुकुल रोहतगी यांनी मंत्री बालाजी यांची बाजू मांडली, तर ईडीकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला. ही सुनावणी न्या. ए. एस. बोपाण्णा आणि न्या. एम. एम. सुंदरेश यांच्या पीठासमोर होत आहे. आरोपींना अटक करुन त्यांची कोठडीत चौकशी करण्याचा तसेच पुरावे गोळा करण्याचा अधिकार ईडीला आहे, असा युक्तिवाद तुषार मेहता यांनी केला आहे.