गांधीनगर / वृत्तसंस्था
गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश गीता गोपी यांनी राहुल गांधी यांच्या मानहानी प्रकरणाच्या सुनावणीतून माघार घेतली आहे. हे प्रकरण अन्य न्यायाधीशांकडे द्यावे, अशी सूचना करणारी नोंद त्यांनी सुनावणीच्या पहिल्याच दिवशी करुन आपण या सुनावणीतून अंग काढून घेत असल्याचे स्पष्ट केले.
सुरतच्या न्यायदंडाधिकाऱयांनी राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणात 2 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर गांधी यांना खासदारकी गमवावी लागली होती. गांधी यांनी या आदेशाविरोधात सुरतच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात दाद मागितली होती. तथापि, तेथेही त्यांना दिलासा न मिळाल्याने त्यांनी गुजरात उच्च न्यायालयात अपील याचिका सादर केलेली आहे. या याचिकेवर बुधवारी प्राथमिक सुनावणी होती. मात्र, आता ही सुनावणी लांबणीवर पडली आहे.
बुधवारी राहुल गांधी यांचे वकील पी. एस. चंपानेरी यांनी याचिकेवर त्वरित सुनावणी घेण्याचा आग्रह धरला होता. मात्र, याला सरकारी वकिलांनी विरोध केला. या याचिकेची सुनावणी लवकर करण्याचे कोणतेही कारण नाही. अन्य प्रकरणांप्रमाणेच सर्वसामान्य कालावधीत सुनावणी करण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला होता.
न्यायाधीशांनी आधी त्वरित सुनावणी करण्यास अनुमती दिली होती. तथापि, नंतर त्यांनी आपल्यासमोर या प्रकरणाची सुनावणी नको अशी भूमिका घेतली. न्या. गीता गोपी यांच्याकडेच सर्वसाधारणपणे गुन्हेगारी अपील याचिका सुनावणीसाठी दिल्या जातात. त्यामुळे ही याचिका त्यांच्याकडे आणण्यात आली होती, असे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न वकील चंपानेरी यांनी नंतर केला.
आता हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या अन्य न्यायाधीशांसमोर चालणार आहे. मात्र, त्यासाठी आधी नव्या न्यायाधीशांची नियुक्ती गुजरात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना करावी लागणार आहे. परिणामी, या याचिकेवर सुनावणी नेमकी केव्हा होईल, याविषयी निश्चित माहिती देण्यात आलेली नाही.









