घराजवळ सापडले जळालेल्या नोटांचे तुकडे : सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवरही व्हिडिओ अपलोड
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घराजवळ काही जळालेल्या नोटा सापडल्या आहेत. न्यायमूर्ती वर्मा यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाची चौकशी सुरू असताना ही घटना उघडकीस आली आहे. त्यांच्या निवासस्थानी आग लागल्यानंतर त्यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त केल्याचा आरोप आहे. आता एका सफाई कामगाराने जळालेल्या नोटांची माहिती दिली आहे.
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या सरकारी निवासस्थानातून सापडलेल्या नोटांच्या बंडलची सर्वत्र चर्चा होत आहे. शनिवार, 22 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने पोलीस आणि अग्निशमन दलाकडून मिळालेले पुरावे आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केले. न्यायालयाने फोटो आणि व्हिडिओ जारी केले. याचदरम्यान, न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घराजवळचा आणखी एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये त्यांच्या घराजवळ जळालेल्या नोटांचे नवीन पुरावे सापडले आहेत. व्हिडिओमध्ये 500 रुपयांच्या अर्ध्या आणि फाटलेल्या नोटा तिथे पडलेल्या दिसत आहेत. अहवालानुसार, न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानातून सुमारे 15 कोटी रुपये जप्त करण्यात आले होते.
इंद्रजीत नावाच्या एका स्वच्छता कामगाराने जळालेल्या अवस्थेतील नोटांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. आपण न्यायमूर्ती वर्मा यांचे घर असलेल्या परिसरात कचरा गोळा करण्याचे काम करतो. ‘आम्ही चार-पाच दिवसांपूर्वी इथे कचरा साफ करत असताना आम्हाला 500 रुपयांच्या जळालेल्या नोटांचे काही छोटे तुकडे सापडले’ असे त्याने सांगितले. तसेच आग कुठून लागली हे आम्हाला माहित नाही. आम्ही फक्त कचरा गोळा करतो, असे स्पष्टीकरणही त्याने दिले.
न्यायमूर्ती वर्मा यांचेही उत्तर
रोख वसुलीच्या मुद्यावर न्यायमूर्ती वर्मा यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर काही तासांतच जळालेल्या नोटांचा हा नवीन व्हिडिओ समोर आला आहे. ज्या खोलीत रोख रक्कम सापडली ती खोली मुख्य निवासस्थानापासून वेगळी आहे आणि ती अनेक लोकांसाठी खुली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. सदर खोलीचा वापर अनेक लोक करतात, असेही न्यायमूर्ती वर्मा यांनी म्हटले.
14 मार्च रोजी होळीच्या दिवशी त्यांच्या दिल्लीतील अधिकृत निवासस्थानाच्या स्टाफ क्वार्टरजवळील स्टोअररूममध्ये आग लागली होती. यादरम्यान कुटुंबातील सर्व सदस्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले. आग विझवल्यानंतर ते खोलीत परतले असता त्यांना रोख रक्कम सापडली नाही. त्यानंतर हे कोट्यावधींच्या नोटांचे प्रकरण उजेडात आले होते.
सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जी. एस. संधावालिया यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शील नागू आणि कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश अनु शिवरामन यांचाही समावेश आहे. याशिवाय, न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याकडे सध्या कोणतेही न्यायालयीन काम सोपवू नये असे आदेश देण्यात आले आहेत.









