सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी-मिठाई वाटून आनंद साजरा : काही ठिकाणी मोठी स्क्रीन लावून चांद्रयान मोहिमेचे थेट प्रक्षेपण
बेळगाव : प्रतीक्षा, उत्सुकता आणि जल्लोष असे काहीसे वातावरण बुधवारी शहर व उपनगरांमध्ये दिसून आले. चांद्रयान-3 ही मोहीम यशस्वी झाल्याने बेळगाव शहरामध्ये फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी मिठाईचे वाटप करण्यात आले. काही ठिकाणी मोठी स्क्रीन लावून चांद्रयान मोहिमेचे थेट प्रक्षेपण नागरिकांना दाखविण्यात आले. चांद्रयान मोहीम यशस्वी होते की नाही, अशी धाकधूक प्रत्येकाच्याच मनात होती. त्यामुळे सायंकाळी 5.30 पासून प्रत्येक जण टीव्ही व मोबाईलवर चांद्रयानाचे थेट प्रक्षेपण पाहत होता. सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान मोहीम यशस्वी ठरल्याने शहर व परिसरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. काहींनी पेढे, लाडू वाटून आनंद साजरा केला.
शाहूनगर येथे लावण्यात आली स्क्रीन
शाहूनगर येथील नगरसेवक श्रेयस नाकाडी यांनी नागरिकांना चांद्रयान मोहिमेचे थेट प्रक्षेपण दाखविले. गणेश चौक येथे लावलेल्या या स्क्रीनवर शेकडो लोकांनी एकत्रितरीत्या चांद्रयान मोहीम पाहिली. मोहीम यशस्वी होताच टाळ्यांचा कडकडाट करून नागरिकांनी जल्लोष केला. उपमहापौर रेश्मा पाटील यांनीही उपस्थिती दर्शविली. 2019 मध्येही गणेश उत्सव मंडपामध्ये स्क्रीन लावून चांद्रयान मोहीम दाखविण्यात आली होती. मुख्य पोस्ट कार्यालयासमोर पोस्ट कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. एन. जी. मोकाशी, सुरेश मेदार यांच्या नेतृत्वाखाली पोस्ट कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला. कंग्राळ गल्ली येथील पंच मंडळ व युवक मंडळांच्यावतीने वेताळ देवस्थानमध्ये पूजा करण्यात आली. मोहीम यशस्वी झाल्यानंतर गल्लीतील पंच बाबुराव कुट्रे, अशोक कंग्राळकर, गोपाळ सांबरेकर, शंकर बडवाण्णाचे, अनंत पाटील, शरद पाटील, छोटू जाधव, बाळू जाधव यांनी आनंद साजरा केला.
चांद्रयान मोहीम यशस्वी होताच युवकांचा जल्लोष
संपूर्ण भारतासह जगाचे लक्ष लागून राहिलेली चांद्रयान-3 मोहीम बुधवारी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयानच्या विक्रम लँडरने चंद्रावर सॉप्ट लँडिंग करून यशस्वी झाली. चांद्रयान-3 मोहीम यशस्वी होताच बाळेपुंद्री, मोदगा, मारीहाळ, सुळेभावी व परिसरातील युवकांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा केला. या मोहिमेद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणारा भारत पहिला देश ठरला आहे. यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे युवकांनी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करत अभिनंदन केले. यावेळी युवकांनी भारत माता की जयच्या घोषणा दिल्या.
शंकरगौडा पाटील यांच्याकडून मोहिमेच्या शास्त्रज्ञांचे कौतुक 
इस्रोने चांद्रयान-3 मोहीम फत्ते केल्याने कर्नाटक सरकारचे दिल्ली येथील माजी प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांनी शास्त्रज्ञांच्या टीमचे अभिनंदन केले. चांद्रयान-3 यशस्वीरीत्या लॅन्ड झाल्याने ही देशवासीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे. या यशस्वी मोहिमेमुळे देशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवण्यात आला. यामध्ये रात्रंदिवस मेहनत घेतलेल्या शास्त्रज्ञांचे शंकरगौडा पाटील यांनी कौतुक केले आहे.
चांद्रयान-3 मोहीम देशासाठी अभिमानास्पद बाब
भारताची चांद्रयान-3 ही मोहीम यशस्वी होण्यामागे इस्रोच्या संशोधक शास्त्रज्ञांचे मोठे यश आहे. ही मोहीम सर्व देशवासीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे, असे जिल्हा पालकमंत्री व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगून इस्रोचे अभिनंदन केले आहे. देशाच्या वैज्ञानिकांकडून अथक परिश्रम घेऊन चांद्रयान-3 मोहीम यशस्वी करण्यात आली आहे. शास्त्रज्ञांनी विक्रम लॅन्डर यशस्वीपणे चंद्रावर उतरवून अवकाश संशोधन क्षेत्रात नवीन इतिहास रचला आहे. यामुळे भारत देशाचे नाव संपूर्ण जगात उंचावले आहे.









