15 ते 20 लाखापर्यंतची आणणार कार : स्पर्धा अधिक रंगणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2023 च्या पहिल्या सहा महिन्यामध्ये भारतात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री 137 टक्के वाढत 48,000 इतकी झाली असून या क्षेत्रामध्ये आता नवनव्या कंपन्या उतरण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. उद्योगपती सज्जन जिंदाल यांच्या नेतृत्वाखाली जेएसडब्ल्यू समूहही आता या क्षेत्रामध्ये उतरणार असल्याचे समजते. याचाच अर्थ लवकरच इलेक्ट्रिक वाहनांच्या स्पर्धेत आणखी एका कंपनीची भर पडणार आहे, हे निश्चित.
भारतातील इलेक्ट्रिक वाहनांच्या स्पर्धेमध्ये जेएसडब्ल्यूला उतरायचे असून 15 ते 20 लाख रुपये किमतीच्या कार्स भारतामध्ये उतरविण्याची योजना कंपनीने बनविली आहे. 2023 च्या पहिल्या सहा महिन्यामध्ये 34,000 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री करत टाटा मोटर्सने 72 टक्के इतका वाटा उचलत निर्भेळ यश इलेक्ट्रिक कार्सच्या स्पर्धेमध्ये मिळवले आहे. त्यांच्या टियागो, नेक्सॉन, टिगोर या इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहकांची वाढती पसंती लाभली आहे. 2024 मध्ये कंपनी आणखी चार इलेक्ट्रिक वाहने आणणार असल्याचेही टाटाकडून सांगण्यात आले आहे.
या इलेक्ट्रिक वाहनांच्या स्पर्धेत पोलाद क्षेत्रात नावाजलेल्या जेएसडब्ल्यूनेही पदार्पण करण्याचे निश्चित केले आहे. टाटा नेक्सॉनला स्पर्धा करणारी कार आणण्याचा त्यांचा इरादा असून सदरची कार महिंद्राच्या एक्सयुव्ही 400 ला टक्कर देईल असे म्हटले जात आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारामध्ये एम. जी. मोटर्स ही 10 टक्के हिस्स्यासह दुसऱ्या नंबरवर आहे. महिंद्रा 9 टक्के वाटा उचलत तिसऱ्या क्रमांकावर आहे. एम. जी. मोटर्स तर आता आपला दुसरा उत्पादन कारखाना सुरू करण्याचा विचारत करत आहे. त्याकरिता 607 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूकही करण्याचे प्रयोजन केले जात आहे. वर्षाला तीन लाख कार्सचे उत्पादन घेण्याची एम. जी. मोटर्सची योजना आहे.
आंतरराष्ट्रीय कंपन्याही सहभागी
या स्पर्धेमध्ये ह्युंडाई, फोक्सवॅगन व टेस्ला यासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या कंपन्यासुद्धा आपल्या कार्स उतरविण्यासाठी नेटाने प्रयत्न करत आहेत. पण आता जेएसडब्ल्यूच्या प्रवेशानंतर स्पर्धा अधिकच रंगणार आहे, हे वेगळे सांगायला नको.









