दरवर्षी 60 लाख टन क्षमतेचा एकत्रित प्रकल्प उभारण्याचा निर्धार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सज्जन जिंदाल यांच्या नेतृत्वाखालील जेएसडब्ल्यू स्टील आणि दक्षिण कोरियाची कंपनी पोस्को यांनी एकत्रितरित्या भारतात दरवर्षी 6 दशलक्ष टन क्षमतेचा एकात्मिक स्टील प्रकल्प उभारण्याचे निश्चित केले आहे. मुंबईत करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. दोन्ही कंपन्यांनी एका संयुक्त निवेदनात ही माहिती दिली. पोस्कोचे होल्डिंग्जचे प्रतिनिधी संचालक आणि अध्यक्ष ली जू-ताई आणि जेएसडब्ल्यू स्टीलचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत आचार्य यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला.
जेएसडब्ल्यू स्टील आणि पोस्को यांनी ऑक्टोबर 2024 मध्ये बॅटरी मटेरियल आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रात दरवर्षी 50 लाख टन सुरुवातीच्या क्षमतेच्या प्रस्तावित स्टील प्लांटसाठी सहकार्याची घोषणा केल्यानंतर हा नवीन विकास झाला आहे. या सामंजस्य करारात प्रस्तावित 50:50 गुणोत्तर संयुक्त उपक्रमासाठी व्यापक चौकट मांडण्यात आली आहे. जयंत आचार्य म्हणाले, ‘ही भागीदारी जेएसडब्ल्यूच्या पोलाद निर्मितीमधील भारतातील मजबूत उपस्थितीला सहाय्यकारक ठरणार आहे. प्रस्तावित उपक्रम आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे आणि देशांतर्गत व निर्यात बाजारपेठांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जागतिक स्तरावर स्पर्धात्मक उत्पादन केंद्र निर्माण करण्यास मदत करेल.’
पोस्को होल्डिंग्जचे प्रतिनिधी संचालक आणि अध्यक्ष ली जू-ताई यांनी एका निवेदनात म्हटले आहे की भारत भविष्यातील जागतिक पोलाद मागणीच्या केंद्रस्थानी आहे. ‘जेएसडब्ल्यूसोबतचे आमचे सहकार्य परस्पर विश्वास वाढवेल, हे नककी.’









