कायदातज्ञांनी लावली हजेरी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कायदा आयोगाचे माजी अध्यक्ष रितुराज अवस्थी हे मंगळवारी एक देश एक निवडणूक विधेयकावर चर्चेसाठी स्थापन संयुक्त संसदीय समितीसमोर (जेपीसी) उपस्थित राहिले. संसदीय समिती या विधेयकासंबंधी सर्व संबंधित तज्ञ आणि घटकांशी चर्चा करत आहे. याच अंतर्गत कायदा तज्ञ म्हणून अवस्थी हे जेपीसीसमोर उपस्थित राहिले.
याचबरोबर आयएएस अधिकारी नितेन चंद्रा हे देखील संसदीय समितीसमोर उपस्थित राहिले. नितेशन चंद्रा हे एक देश, एक निवडणूक विषयक सहमती तयार करणाऱ्या माजी राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांच्या नेतृत्वाखालील समितीत सचिव म्हणून कार्यरत होते. माजी सरन्यायाधीश यू. यू. ललित देखील जेपीसीसमोर उपस्थित राहणार आहेत.
माजी काँग्रेस खासदार ई. एम. सुदर्शन नचियप्पन यांनी 2015 मध्ये एकत्रित निवडणूक करविण्याच्या बाजूने संसदीय समितीचे नेतृत्व केले होते, नचियप्पन देखील समितीसमोर स्वत:चे विचार मांडणार आहेत. केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ‘एक देश, एक निवडणूक’ करता एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली होती. या समितीने स्वत:च्या विस्तृत अहवालात एक देश एक निवडणूक विचाराचे जोरदार समर्थन केले होते.
या समितीच्या शिफारसी केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वीकारल्या आहेत. तसेच सरकारने लोकसभेत घटनादुरुस्ती करणाऱ्या एका विधेयकासह दोन विधेयके संसदेत मांडली आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या विधेयकांवर चर्चा करण्यासाठी भाजप खासदार पी. पी. चौधरी यांच्या अध्यक्षतेत 39 सदस्यीय संयुक्त संसदीय समिती स्थापन केली आहे. संसदीय समितीने आतापर्यंत 3 बैठका घेतल्या आहेत.









