काकती येथे मान्यवरांच्या हस्ते चावीचे हस्तांतरण
वार्ताहर/काकती
बेळगाव खडेबाजार येथील जॉय आलुक्कास या सुवर्णपेढी कंपनीच्या जॉय आलुक्कास फौंडेशनच्यावतीने जॉय होम या सात लाख रुपये निधी उपक्रमातून बांधलेल्या नूतन घराची चावी दिव्यांग लाभार्थीला हस्तांतरण करण्याचा कार्यक्रम भावकाई गल्ली-काकती येथे शुक्रवारी पार पडला. कार्यक्रमात सेल्स प्रतिनिधी प्रियांका कुरडेकर यांनी स्वागत केले. मान्यवरांना पुष्पगुच्छ देण्यात आले. मॅनेजर सचिन म्याकनमर्डी म्हणाले, बेळगाव तालुक्यात संपगाव, हलगा, काकती, बी. के. कंग्राळी या ठिकाणी प्रत्येकी एक घर तर मच्छे येथे दोन घरे अशी 6 घरे बांधण्यात आली आहेत. ‘आनंदाचा स्पर्श वाटून घ्या’ हे आमच्या कंपनीचे ध्येय असून कंपनी गरजूंना मदत करून हास्य फुलविते.
ग्राम पंचायत विकास अधिकारी अरुण नाथबुवा यांनी या घराचा लाभार्थी सुधीर बेडका हा दिव्यांग असून त्यांची बहीण मंगल यांना या स्मार्ट घराचा लाभ मिळाला आहे. या भावंडांचे आई-वडिलांचे छत्र लहानपणीच हरपल्याने त्यांना घराचासुद्धा आसरा नव्हता. ते भाडोत्री घरात राहत होते. अशा कठिण काळात या कंपनीने घर बांधून दिले आहे. आज या भावंडांना फ्रीज व मिक्सरही कंपनीने मोफत दिले आहे. यावेळी कंपनीचे मॅनेजर, पीडीओ व मान्यवर यांच्या हस्ते घराचे पूजन करून श्रीफळ वाढविण्यात आले. ग्रा.पं. लेखाधिकारी सोमनाथ बाबी, कंपनीचे प्रतिनिधी प्रसाद चोडणकर, सीआरओ मुस्ताक बालप्रवेश व ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांना मिठाई व अल्पोपाहार देण्यात आला. सेल्स प्रतिनिधी विद्या बांदेवाडकरने आभार मानले.









