प्रतिक्विटंल भाव 500 ते 2500 रुपये
वार्ताहर /अगसगे
बेळगाव तालुक्यातील यंदाच्या हंगामातील जवारी बटाटा विक्रीसाठी बुधवारी एपीएमसीमध्ये दाखल झाला होता. प्रतिक्विटंल भाव 500 ते 2500 रुपये झाला. गेल्या कित्येक वर्षापासून बेळगाव-खानापूर तालुक्यामध्ये पावसाळ्यात जालंधर बियाणे खरेदी करून बटाटा लागवड केली जाते. गणेशचतुर्थीनंतर काढणीला मोठ्या प्रमाणात सुरुवात होते. यंदा पावसाने दडी मारल्याने बटाटा पिकाचे उत्पादन खुंटले आहे. गोळी व मिडीयम आकाराचा बटाटा मिळत आहे. मोठवड व गोळा बटाटा पावसाअभावी मोठा झालाच नाही. यामुळे उत्पादनात मोठ्याप्रमाणात घट निर्माण होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
पहिली आवक दाखल
तालुक्यातील भुत्तरामट्टी, कुरीहाळ, कंग्राळी, कडोली या गावातून यंदाच्या हंगामातील पहिली बटाटा आवक विक्रीसाठी मार्केट यार्डमध्ये दाखल झाली. यावेळी गणेश ट्रेडर्समध्ये 12 पिशव्या, श्रीराम लक्ष्मी ट्रेडर्समध्ये-19 पिशव्या, दीपक ट्रेडर्समध्ये-20 पिशव्या आणि साईकृपा ट्रेडर्स कंपनीमध्ये-6 पिशव्या असे एकूण 57 पिशव्या आवक मार्केटयार्डमध्ये दाखल झाली होती. बटाटा आवक मसार जमीन आणि लाल जमिनीमधून काढण्यात आलेला बटाटा असल्याची माहिती कल्लाप्पा पाटील यांनी याप्रसंगी दिली. गणेशचतुर्थीनंतर सुरुवातीला मसार जमीन व लाल जमिनीमधील बटाटा काढणीला प्रारंभ होतो. त्यानंतर काळ्या जमिनीतील बटाटा काढणीला प्रारंभ होतो. जवारी बटाट्याला दिल्ली, मुंबई, पंजाब, बेंगळूर, हरियाणा आदी ठिकाणी मोठ्याप्रमाणात मागणी असते. बुधवारी प्रथम जवारी बटाटा आणलेल्या शेतकऱ्यांचा व्यापाऱ्यांकडून सन्मान करण्यात आला. बटाटा टप्पीला हार घालून श्रीफळ, पेढे वाटून पूजा करण्यात येऊन पेढे, साखर, फुटाने वाटण्यात आले. प्रथमच आलेल्या नवीन बटाटा खरेदीकडे व्यापारीसुद्धा आकर्षित होत आहेत.
बुधवारी या बटाट्याचा भाव प्रति क्विटंलला पुढीलप्रमाणे होता.
- गोळी – 500 ते 600 रु.
- मिडीयम – 1100 ते 1300 रु.
- मोठवड – 2000 ते 2500 रु.









