आपल्या सगळ्यांचं रोजचं जगणं दैनंदिनीनुसार सुरू असतं पण मध्येच कधीतरी एकदम उकाडा जाणवायला लागतो. एकदम आभाळ भरून येतं किंवा एकदम पावसाच्या सरीसुद्धा. हा सगळा भावनांचा प्रवास जसा माणसाच्या जीवनात तसाच निसर्गाच्यासुद्धा जीवनात सुरू असतो. कधी झाडं भरभरून बहराला येतात तर कधी उघडी बोडकेसुद्धा पडतात. कधी आनंद तर कधी विरह पण झाडे कधी माणसासारखे विलाप करत बसत नाहीत. कारण नवीन येणाऱ्यासाठी जागा करून द्यायचे हे ठरलेलं असतं आणि म्हणूनच शिशीरामध्ये किंवा वैशाखातसुद्धा आनंदाने ही पानझड या मातीमध्ये पुन्हा मिसळते. पुनर्रपी जनन पुनर्रपी मरण या उक्तीनुसार ती वागत असते. फुलपाखराचेसुद्धा आयुष्य असेच. खरंतर अवघ्या दहा-पंधरा दिवसाचे त्याचे आयुष्य. पण जन्माला आल्यापासून आनंदाचे कोश तो विणत असतो आणि इतरांना नेत्र सुख देत असतो. आनंदाची वाण वाटायचीच असतात, याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे फुलपाखरू. त्यांचे बागडणे, त्यांचे रंग या सगळ्या गोष्टी आपल्या मनात घर करून राहतात. अगदी दहा-पंधरा दिवसाच्या आयुष्यानंतरसुद्धा. पण माणसाला मात्र सतत मनाला बजावायला लागतं की असा आनंद निर्माण करायचा असतो. दुसऱ्याच्या जीवनात आणि स्वत:च्या वागण्याने. पण तो इतर कुठल्यातरी काळजीने किंवा दु:खाने आपला प्रत्येक क्षण वाईट करत असतो आणि आपण खूप आनंदात आहोत, असं दाखवायचा प्रयत्न करतो. त्यावेळी माणसाच्या लक्षात येत नाही की, ‘जीवा सवे जन्म मृत्यू’ हा जगण्याचा मंत्र असतो पण आम्ही जन्माला येताना इतके हरकून गेलेलो असतो की आमच्या पाठोपाठ पाठीला पाठ लावून कधी मृत्यू आला हे लक्षातच राहत नाही. आपण प्रत्येक जण श्वास मोजून घेऊन आलेलो असतो म्हणून तर मृत्यूला काल असं म्हणतात. काल म्हणजेच सर्प. सापाचा चालण्याचा आवाज कधीच येत नसतो. तसाच हा काळ संपत असतो. त्याची जाणीव माणसाला होत नसते. माणूस जगण्याच्या उत्सवामध्ये आनंदात इतका भरकटतो की आपण जाता जाता किती दु:खाच्या वाटा निर्माण केल्या आहेत, हेच त्याच्या लक्षात येत नाही आणि नंतर या दु:खामध्ये तो जेव्हा गळ्यापर्यंत आटतो, त्यावेळेला तेव्हा त्याला जाणीव होते. खरंतर आमचं जगणं आणि मृत्यू हा एक गोलाकार प्रवास असतो. जसं आमच्या शरीरामध्ये रक्त चक्राकार फिरतं. आकाशातून पृथ्वीपर्यंत पृथ्वीतून आकाशात हे तत्व आमच्या शरीरामध्ये असते. पाण्याचासुद्धा प्रवास सागरापासून आकाशापर्यंत असाच गोलाकार चालू असतो. तसंच माणसाच्या जीवनातसुद्धा, त्याच्या जन्म आणि मृत्यूच्या प्रवासात त्याला अनेक प्रवासी भेटतात. काही बरेच दिवस बरोबर राहतात तर काही सोडून जातात. काही जण पुन्हा पुन्हा नव्याने भेटतातसुद्धा पण शेवटपर्यंत कोणीच नसतं. तो प्रवास आपल्याला एकट्यालाच करायचा असतो, याची जाणीव मात्र आपल्याला नसते. आमच्या जगण्याच्या प्रत्येक प्रवासाच्या टप्प्यात अनेक सहप्रवासी, मित्र नातेवाईक अगदी जवळचेसुद्धा असलेले दुरावतात आणि रक्ताचे नसलेले नाते नातेवाईकसुद्धा जोडले जातात. हा सगळा प्रवास पाहिला तर तो कधीही सुखावह असतो तर कधी दुखावह. पण मुळातच हा प्रवास अंधारातून अंधाराकडे असाच असतो.
Previous Article‘बंदा’मध्ये मनोज वाजपेयी
Next Article आजचे भविष्य शनिवार दि. 29 एप्रिल 2023
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.