सोन्याळ :
एसटी महामंडळाने स्वमालकीच्या बीएस ६ च्या ३ हजार लालपरी खरेदी करण्यासाठी निविदा काढली आहे. या लालपरी अधिक आरामदायी असून ५४ सीटर असणार आहेत. यामुळे राज्यातील एसटी प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर आणि आरामदायी होणार आहे. या ३ हजार बस खरेदीकरिता राज्य सरकार महामंडळाला एक हजार २०० कोटी रुपये देणार आहे.
महामंडळाच्या ताफ्यात सध्या १४ हजार बसेस आहेत. परंतु त्यापैकी सुमारे ४० टक्के बसचे आयुर्मान पूर्ण झाले असल्याने त्या येत्या काही महिन्यांत प्रवासी सेवेतून बाद होतील. सध्याच्या घडीला एसटीतून दिवसाला सुमारे ५३ लाख प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांच्या सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाकरिता स्वमालकीच्या बस घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे, एसटी महामंडळाने महाराष्ट्र २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी स्व-मालकीच्या बीएस ६ मानकाच्या डिझेल इंजिन असलेल्या चेसिसवर पूर्णपणे बांधून तयार असलेल्या एकूण ३ हजार लालपरी बस खरेदी करण्यासाठी टेंडर काढले आहे.
या बस चेसिस खरेदी आणि त्यावर बॉडी ही बस चेसिस पुरवठादारांशी संलग्नित कारखान्यातून बस बॉडी बांधून घेतली आहे. ही बस डिझेल इंधनवर चालणारी ११ मीटर लांबीची २ बाय ३ पुशबॅक ५४ सीट्स असलेली साधी बस अशा प्रकारातील असणार आहे.
- एसटी महामंडळातर्फे पंचवार्षिक योजना तयार
एसटी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या पाच हजार साध्या लालपरी बस खरेदी करणार आहे. यासाठी महामंडळातर्फ पंचवार्षिक योजना तयार केली आहे. महामंडळात यापुढे कुठल्याही पद्धतीने भाडेतत्त्वावर बस न घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला आहे. त्यामुळे स्वमालकीच्या बस घेण्यात येणार आहेत. या आर्थिक वर्षात पहिल्या टप्प्यात ३ हजार बस येणार आहेत अशी माहिती प्राप्त झाली आहे.








