प्रतिनिधी/ बेळगाव
पत्रकार संघटनेच्यावतीने एस. जी. बाळेकुंद्री तांत्रिक महाविद्यालयाच्या आवारातील शिवकुमार संबरगीमठ सभागृहात आयोजित करण्यात आलेला पत्रकारांच्या मुलांसाठी पुरस्कार देण्याचा कार्यव्र्रम उत्साहात पार पडला. दहावी, बारावीसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या 25 विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
केएलई संस्थेचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार असिफ सेठ, महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष विलास जोशी आदींची भाषणे झाली.
यावेळी बोलताना डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले, पत्रकार हा समाजाचा अविभाज्य घटक आहे. त्यांच्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याचा आपल्याला आनंद झाला आहे. पत्रकारांचे व्यावसायिक जीवन कष्टदायक असते. सततच्या कामामुळे कुटुंबाकडे, मुलांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. पत्रकारांनी कुटुंब व मुलांकडे लक्ष देण्याबरोबरच स्वत:चेही आरोग्य सांभाळावे, असा सल्ला त्यांनी दिला. श्रीशैल मठद यांनी स्वागत केले. रवींद्र उप्पार यांनी प्रास्ताविक केले. सुनीता देसाई यांनी सूत्रसंचालन केले. संतोष चिनगुडी यांनी आभार मानले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी व कुटुंबीय उपस्थित होते.









