सलग पाच दिवसांपासून गोळीबाराच्या घटना
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूर येथे सलग पाचव्या दिवशी कुकी आणि मैतेई गटांमध्ये गोळीबार झाला. शुक्रवारी रात्री उशिरा थामनपोकपी आणि सानासबी येथे झालेल्या गोळीबारात एक महिला जखमी झाली. त्यानंतर शनिवारी सकाळी झालेल्या गोळीबारात एका स्थानिक वृत्तवाहिनीचा व्हिडिओ पत्रकार जखमी झाला. शुक्रवारीही सानासबी भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक पोलीस कर्मचारी आणि एक गावकरी जखमी झाले होते.
मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी पुन्हा एकदा दोन्ही समुदायांना शांततेचे आवाहन केले आहे. तसेच मी इंफाळ पूर्वेतील सानासबी आणि थामनपोकपी येथे कुकी अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबाराचा तीव्र निषेध करतो, असे ते म्हणाले. निरपराधांवर हा भ्याड हल्ला म्हणजे मणिपूरच्या शांतता आणि सौहार्दावर हल्ला असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे.
कुकी-मैतेई समुदायाने परस्पर समंजसपणा निर्माण करावा, असे
मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी म्हटले होते. मणिपूरमध्ये त्वरित शांततेची गरज आहे. दोन्ही समुदायांमध्ये परस्पर समंजसपणा निर्माण करा. मणिपूरला फक्त भाजपच वाचवू शकतो असेही ते म्हणाले होते. आज मणिपूरमध्ये जे काही घडत आहे त्याची अनेक कारणे आहेत. लोक सत्तेसाठी भुकेले आहेत. आम्ही कोणत्याही विशिष्ट समाजाच्या विरोधात नाही. भाजपची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही पोलीस आणि जनता यांच्यात सुसंबंध निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. आम्ही कधीही चुकीचे काम केले नाही. आपल्याला फक्त भावी पिढी वाचवायची आहे. दोन्ही समुदायांनी शांतता राखली पाहिजे. भूतकाळाकडे न पाहता एनआरसी प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आम्ही आमचे काम लोकशाही आणि संवैधानिक पद्धतीने सुरू ठेवू, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते.









