कोल्हापूर :
लक्ष्मीपुरी येथील प्लास्टिक व्यावसायिक सनी दर्डा यांना दुकान बंद करण्याची भीती घालून, तीन लाख रुपयांची खंडणी उखळलेल्या तोतया पत्रकाराच्या टोळीतील तोतया पत्रकार जावेद हुसेन देवडी (वय 33, रा. सदर बाजार) याला लक्ष्मीपुरी पोलीसांनी अटक केली. तो गेल्या काही दिवसापासून पसार होता. त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने त्याला 31 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
प्लॉस्टिक व्यापारी सनी दर्डा यांच्या दुकानात तोतया पत्रकार अन्सार रफीक मुल्ला, शशिकांत कुंभार, जावेद देवडी, रहिम पिंजारी, दिलीप थोरात, मोहसिन मुल्ला, अजय सोनुले अशा आठ ते दहा जणांच्या टोळक्याने दुकानाचे शुटींग केले. तुमच्या दुकानात बेकायदेशिरपणे प्लॉस्टिकच्या पत्रावळ्या, द्रोण, ग्लासची विक्री केली जाते. आम्ही बातमी छापली तर दुकान बंद होईल. अशी भीती दाखवून पाच लाखांची खंडणी मागितली. दर्डा यांनी घाबरून 3 लाख रुपये अन्सार मुल्ला याच्याकडे दिले.
त्यानंतर पुन्हा तथाकथीत सामाजिक कार्यकर्ता अजित पवारसह शहरातील एका स्थानिक वृत्तवाहिनीचा कॅमेरामन सागर चौगले, मयूर कांदेकर, सुशांत बोरगे, सुभाष कांबळे आदी आठ जणांनी दर्डा यांच्या दुकानात जाऊन कारवाईची भीती दाखवून, पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. दर्डा यांनी याबाबत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.








