ठेकेदारासह तिघे ताब्यात : देवस्थान व कोडोली पोलिसांची संयुक्त कारवाई
वारणानगर/प्रतिनिधी
संपूर्ण महाराष्ट्राचे लोकदैवत असलेल्या वाडी रत्नागिरी ता. पन्हाळा येथील कुलदैवत श्री जोतीबस येणाऱ्या भाविकांच्या वाहनास दुप्पट तिप्पट दराने बेकायदेशीर कर वसुली करत असताना जिल्हा अधिकारी कोल्हापूर यांचे प्रतिनिधी तसेच पश्चिम महाराष्ट्रा देवस्थान समिती व कोडोली पोलीस यांच्या पथकाने बनावट भाविक म्हणून छापा टाकत बेकायदेशीर प्रवासी कर वसूल करणाऱ्या ठेकेदारासह तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून वेगवेगळ्या दराचे पावती पुस्तकासह चोवीस हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
कोल्हापूर जिल्हा अधिकारी राहुल रेखावर, जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडी यांच्याकडे गेली काही दिवस जोतिबा येथील देवस्थान समितीने ठेकेदार पद्धतीने चालवण्यास दिलेल्या प्रवासी कर नाका येथील ठेकेदार व त्याचे कर्मचारी नियमबाह्य पद्धतीने बनावट पावती द्वारे कर वसुली करत असल्याच्या तक्रारी येत होत्या. या अनुषंगाने कोडोली पोलीस ठाण्यास चौकशीचे आदेश दिले होते. गुरुवार दि. 28 रोजी सायंकाळी कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड, पश्चिम महाराष्ट्र देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवडे, या कारवाई बाबत जिल्हा अधिकारी कर्मचारी यांच्या बरोबर सापळा रचला. बनावट भाविक म्हणून छापा टाकत असता तेथे प्रवाशांकडून वीस रुपये प्रवासी कर आकारण्याचा करार असताना ठेकेदार व त्याचे कर्मचारी यांनी बनावट पावती पुस्तकाद्वारे ४० व ६० रुपयाच्या पावत्या छापून त्या बनावट पावत्या भाविकांना देऊन त्यांच्याकडून बेकायदेशीर लूट तसेच शासनाच्या कराराचा भंग करून शासनाची व देवस्थानची फसवणूक करून लाखो रुपयांना गंडा घातल्याने ठेकेदार अनिल पोपटराव मिटके, अक्षय वैभव शिंगे, रतन भगवान बुने या तिघांना तात्काळ ताब्यात घेतले असून याची व्याप्ती वाढणार आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम चालू होते. या कारवाईत पोलीस नाईक प्रदीप यादव, नामदेव सुतार, उदय काटकर, कॉन्स्टेबल कृष्णाथ पाटील, अभिजित पाटील, हवालदार भैरू माने, अंमलदार नंदाताई शिंदे यांनी काम पाहिले.









