वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची अव्वल स्क्वॅशपटू जोश्ना चिन्नाप्पाने अकरावे पीएसए टूर स्पर्धेचे जेतेपद पटकावताना इजिप्तच्या हाया अलीचा चार गेम्समध्ये पराभव करून जपान ओपन स्क्वॅश स्पर्धा जिंकली.
योकोहामा येथे झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत जोश्नाने इजिप्तच्या तिसऱ्या मानांकित हाया अलीचा 11-5, 11-9, 6-11, 11-8 असा 38 मिनिटांच्या खेळात पराभव केला. या चॅलेंजर स्पर्धेत 15000 अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस ठेवण्यात आले होते. जोश्ना सध्या जागतिक क्रमवारीत 117 व्या स्थानावर असून उपांत्य फेरीत तिने इजिप्तच्या चौथ्या मानांकित राणा इस्माईलचा 11-7, 11-1, 11-5 असा फडशा पाडला होता.
दरम्यान, सिलिकॉन व्हॅली ओपन स्पर्धेच्या शेवटच्या सोळा फेरीत पुरुष विभागातील भारताचा राष्ट्रीय चॅम्पियन व जागतिक क्रमवारीत 29 व्या स्थानावर असणाऱ्या अभय सिंगला फ्रान्सच्या जागतिक नवव्या मानांकित व येथे पाचवे मानांकन मिळालेल्या व्हिक्टर क्रूइनकडून 4-11, 2-11, 1-11 असा एकतर्फी पराभव स्वीकारावा लागल्याने त्याचे आव्हान संपुष्टात आले. 130,500 अमेरिकन डॉलर्स रकमेची पीएसए गोल्ड स्पर्धा अमेरिकेतील रेडवुड सिटी येथे होत आहे.









