केंद्र सरकारची दोन पथके उत्तराखंडमध्ये दाखल ः बचावासाठी कृती आराखडा तयार
जोशीमठ / वृत्तसंस्था
उत्तराखंडच्या जोशीमठला सोमवारी सरकारने आपत्तीग्रस्त क्षेत्र घोषित केले. जोशीमठमधील भूस्खलनाच्या धोक्यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) रविवारी उच्चस्तरीय बैठक घेतल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने लोकांना स्थलांतरित करण्यासाठी कृती आराखडा तयार केला. तसेच आता जोशीमठ व परिसरात बांधकामांना बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारची दोन तज्ञ पथके जोशीमठमध्ये दाखल झाली असून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यास प्रारंभ केला आहे. या पथकामध्ये जलशक्ती मंत्रालयाच्या अधिकाऱयांचाही समावेश आहे.
उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये भूस्खलनाबरोबरच घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. जोशीमठच्या परिस्थितीबाबत राज्यापासून केंद्र सरकारही चिंतेत दिसत आहे. जोशीमठमधील 603 घरांना तडे गेले आहेत. भीतीपोटी बहुतांश लोक घराबाहेर राहत आहेत. दरड कोसळण्याच्या भीतीने भाडेकरूंनीही घरे सोडली आहेत. आतापर्यंत 70 कुटुंबांना तेथून बाहेर काढण्यात आले आहे. उर्वरित लोकांना अन्यत्र हलविण्याचे काम सुरू आहे. प्रशासनाने लोकांना मदत छावण्यांमध्ये जाण्याचे आवाहन केले आहे. बाधितांना रेशन किटचे वाटप करण्यात येत आहे.
जोशीमठमध्ये दरड कोसळणे, घरांना तडे जाणे, पाणी झिरपणे यासारख्या समस्या समोर आल्यानंतर राज्य आणि केंद्र सरकार गंभीर झाले आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दाखल झालेली केंद्राची दोन पथके पुढील काही दिवस आढावा घेऊन पंतप्रधान कार्यालयाला अहवाल सादर करतील, असे चमोलीचे जिल्हाधिकारी हिमांशू खुराणा यांनी सांगितले. यापूर्वी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला आहे. या अहवालाच्या माध्यमातून या भागातील लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी हालचाली गतिमान करण्यात आल्या आहेत.

धोकादायक घरांवर लाल खुणा
जोशीमठमध्ये भूस्खलनाचा धोका असलेल्या इमारतींवर जिल्हा प्रशासनाने लाल निशाण्या लावण्यास सुरुवात केली आहे. सिंहधर, गांधीनगर, मनोहरबाग, सुनील वॉर्ड आदी भाग असुरक्षित घोषित करण्यात आला आहे. या भागात प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला आहे. येथील घरांच्या भिंतींवर दर्शनी भागात लाल रंगाची फुली काढण्यात आली आहे.
पाऊस कोसळल्यास परिस्थिती बिघडणार!
जोशीमठमधील जनतेसाठी पुढील काही दिवस अडचणीचे ठरू शकतात. हवामान खात्याने येथे पावसाचा इशारा दिला आहे. येथे आकाश ढगाळ होत आहे. 11 आणि 12 जानेवारीला व्यक्त केल्या जाणाऱया पावसाच्या इशाऱयानुसार पाऊस पडला, तर भेगा पडलेल्या घरांसाठी तो आणखी धोकादायक ठरू शकतो. 11 आणि 12 जानेवारी रोजी राज्यातील डोंगराळ भागात पाऊस पडण्याची शक्मयता देहराडून येथील हवामान केंद्राचे संचालक विक्रम सिंह यांनी वर्तवली आहे. सध्या जोशीमठमध्ये वातावरणात बदल होत असून सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते.









