43 चेंडूत धमाकेदारी शतकी खेळी : अॅरॉन फिंच, मॅक्सवेलचा मोडला विक्रम
वृत्तसंस्था/ स्टॉकहोम
ऑस्ट्रेलियाचा स्फोटक यष्टीरक्षक फलंदाज जोस इंग्लिशने स्कॉटलंडविरुद्ध दुसऱ्या टी 20 सामन्यात अवघ्या 43 चेंडूत शतक झळकावले. यासह, तो आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज बनला. इंग्लिशने 49 चेंडूत 210.2 च्या स्ट्राईक रेटने 103 धावा केल्या. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 7 शानदार षटकार मारले. इंग्लिशच्या या धमाकेदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 4 बाद 196 धावा केल्या. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना स्कॉटलंडचा डाव 126 धावांवर आटोपला. या विजयासह कांगारुंनी तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. शतकी खेळी साकारणाऱ्या इंग्लिशला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
शुक्रवारी एडनबर्ग येथे झालेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली. गेल्या सामन्यातील स्टार सलामीवीर ट्रॅव्हिस हेड दुसऱ्याच षटकात खाते न उघडता बाद झाला, तर दुसरा युवा सलामीवीर जेक फ्रेझर मॅकगर्क हाही चौथ्याच षटकात पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर आलेल्या यष्टिरक्षक फलंदाज जोश इंग्लिशने अवघ्या 20 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने कॅमरुन ग्रीनसह 92 धावांची भक्कम भागीदारी केली. ग्रीनने 29 चेंडूत 36 धावा केल्या. फटकेबाजीच्या प्रयत्नात ग्रीन बाद झाल्यानंतर मार्क स्टोनिससह इंग्लिशने डावाला आकार दिला. इंग्लिशने सलग 2 षटकारांसह अवघ्या 43 चेंडूत दुसरे टी 20 आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले. 19 व्या षटकांत इंग्लिश बाद झाला. स्टोनिसने नाबाद 20 तर टीम डेव्हिडने नाबाद 17 धावा केल्या. या जोरावर ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 4 बाद 196 धावांचा डोंगर उभा केला.
विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना स्कॉटलंडच्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर सपशेल नांगी टाकली. ब्रँडॉन मेकम्युलनने सर्वाधिक 59 धावा केल्या तर जॉर्ज मुन्सीने 19 धावांचे योगदान दिले. हे दोघे वगळता एकाही फलंदजाला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. स्कॉटलंडचा डाव 16.4 षटकांत 126 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून मार्क स्टोनिसने 4 तर ग्रीनने 2 बळी घेत विजयात मोलाचे योगदान दिले. उभय संघातील तिसरा व शेवटचा सामना दि. शनिवारी रात्री उशिरा खेळवण्यात येईल.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया 20 षटकांत 4 बाद 196 (मॅकगर्क 16, इंग्लिश 103, कॅमरुन ग्रीन 36, स्टोनिस नाबाद 20, डेव्हिड नाबाद 17, ब्रॅड करी 3 बळी)
स्कॉटलंड 16.4 षटकांत सर्वबाद 126 (मुन्सी 16, मेकम्युलन 59, स्टोनिस 4 तर ग्रीन 2 बळी).
महत्वाचा बॉक्स
इंग्लिशचा धमाका, अवघ्या 43 चेंडूत शतक
एडनबर्ग येथे झालेल्या सामन्यात जोस इंग्लिशने अवघ्या 43 चेंडूत शतक झळकावले. स्कॉटलंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करताना त्याने 49 चेंडूत 7 चौकार व 7 षटकारासह 103 धावा फटकावल्या. या शतकाच्या जोरावर, इंग्लिसने अॅरॉन फिंच व मॅक्सवेलचा विक्रमही मोडला, ज्यांनी प्रत्येकी 47 चेंडूत शतके झळकावली होती. या सामन्यात 43 चेंडूत शतक झळकावत इंग्लिश आता टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वात जलद शतक झळकावणारा खेळाडू बनला आहे.
टी 20 मध्ये ऑस्ट्रेलियासाठी वेगवान शतक
- जोस इंग्लिश – 43 चेंडूत शतक (2024)
- अॅरॉन फिंच – 47 चेंडूत शतक (2013)
- ग्लेन मॅक्सवेल – 47 चेंडूत शतक (2023)









