सुपर 12 फेरीत पोहोचण्याची विंडीजला संधी, होल्डरचे 3 बळी

वृत्तसंस्था /होबार्ट
आयसीसी टी-20 विश्वचषक पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेत बुधवारी झालेल्या ‘ब’ गटातील प्राथमिक फेरीच्या सामन्यात अल्झारी जोसेफ व जेसन होल्डर यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर विंडीजने झिम्बाब्वेचा 31 धावांनी पराभव करून सुपर-12 फेरीच्या टप्प्यासाठी आपले आव्हान जिवंत ठेवले.

या सामन्यात विंडीजने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 153 धावा जमविल्या. त्यानंतर झिम्बाब्वेचा डाव 18.2 षटकात 122 धावांवर आटोपला. विंडीजच्या डावामध्ये सलामीच्या चार्ल्सने 36 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 45, आर. पॉवेलने 21 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 28, अकिल हुसेनने 18 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 23, लेविसने 1 चौकारासह 15 आणि मेयर्सने 2 चौकारांसह 13 धावा जमविल्या. विंडीजच्या डावात 4 षटकार आणि 9 चौकार नोंदविले गेले. झिम्बाब्वेतर्फे सिकंदर रझा यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 19 धावात 3 तर मुझारबनीने 38 धावात 2 तसेच विल्यम्सने 17 धावात 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना झिम्बाब्वेच्या डावामध्ये जाँग्वेने 22 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 29, सलामीच्या मधेवेरेने 19 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 27, कर्णधार चकबव्हाने 3 चौकारांसह 13, सिकंदर रझाने 8 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 14, बर्लने 19 चेंडूत 3 चौकारांसह 17 धावा जमविल्या. झिम्बाब्वेच्या डावात 3 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे जोसेफने 16 धावात 4 तर होल्डरने 12 धावात 3 तसेच अकिल हुसेन, मॅकॉय आणि ओडेन स्मिथ यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील हा आठवा सामना होता. ‘ब’ गटामधील प्रत्येक संघाने दोन सामन्यानंतर प्रत्येकी एक विजय नोंदविला आहे. आता शुक्रवारी विंडीज आणि आयर्लंड तसेच स्कॉटलंड आणि झिम्बाब्वे यांच्यात सामने होणार असून या सामन्यातील विजयी संघ सुपर-12 टप्प्याच्या दिशेने मार्गक्रमण करतील.
संक्षिप्त धावफलक
विंडीज 20 षटकात 7 बाद 153 (चार्ल्स 45, पॉवेल 28, अकिल हुसेन नाबाद 23, लेविस 15, मेयर्स 13, मुझारबनी 2-38, सिकंदर रझा 3-19, विल्यम्स 1-17), झिम्बाब्वे 18.2 षटकात सर्वबाद 122 (जाँग्वे 29, मधेवेरे 27, चकबव्हा 13, सिकंदर रझा 14, बर्ल 17, जोसेफ 4-16, होल्डर 3-12, अकिल हुसेन 1-25, ओडेन स्मिथ 1-31).
कॅम्फरच्या शानदार कामगिरीमुळे आयर्लंड विजयी

होबार्ट : आयसीसी विश्वचषक पुरुषांच्या टी-20 क्रिकेट स्पर्धेतील प्राथमिक फेरीच्या ‘ब’ गटातील सामन्यात सामनावीर कर्टिस कॅम्फरच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर आयर्लंडने स्कॉटलंडचा 6 चेंडू बाकी ठेवून 6 गडय़ांनी पराभव करत आपले आव्हान जिवंत ठेवले.
या सामन्यात स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 176 धावा जमविल्या. त्यानंतर आयर्लंडने 19 षटकात 4 बाद 180 धावा जमवित हा सामना 6 गडय़ांनी जिंकला. आयर्लंडच्या कॅम्फर आणि डॉकरेल यांनी 119 धावांची अभेद्य शतकी भागीदारी केली तर स्कॉटलंडच्या मायकेल जोन्सचे अर्धशतक वाया गेले.
स्कॉटलंडच्या डावामध्ये मायकेल जोन्सने 55 चेंडूत 4 षटकार आणि 6 चौकारांसह 86 धावा झळकविल्या. क्रॉसने 21 चेंडूत 5 चौकारांसह 28, कर्णधार रिची बेरिंग्टनने 27 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 37 धावा जमविल्या. मायकेल लियास्कने 13 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 17 धावा केल्या. सलामीचा मुन्से एका धावेवर बाद झाला. जोन्स आणि बेरिंग्टन यांनी 77 धावांची भागीदारी केली. स्कॉटलंडच्या डावामध्ये 5 षटकार आणि 16 चौकार नोंदविले गेले. आयर्लंडतर्फे कॅम्फरने 9 धावात 2 तर लिटल आणि ऍडेर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना आयर्लंडच्या डावामध्ये 4 बाद 65 अशा स्थितीनंतर कर्टिस कॅम्फरने 32 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांसह नाबाद 72 तर डॉकरेलने 27 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 39 धावा जमविल्या. या जोडीने पाचव्या गडय़ासाठी अभेद्य 119 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करीत संघाला विजय मिळवून दिला. या जोडीने केवळ 53 चेंडूतच शतकी भागीदारी नोंदविली.
याशिवाय पॉल स्टर्लिंगने 1 चौकारासह 8, कर्णधार बलबिर्नीने 12 चेंडूत 2 चौकारांसह 14, टकेरने 17 चेंडूत 2 चौकारांसह 20 तर टेक्टरने 16 चेंडूत 1 चौकारासह 14 धावा जमविल्या. आयर्लंडच्या डावात 3 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले. स्कॉटलंडतर्फे वॅट, व्हिल, शेरीफ आणि लियास्क यांनी प्रत्येकी 1 गडी बाद
केला.
संक्षिप्त धावफलक
स्कॉटलंड 20 षटकात 5 बाद 176 (जोन्स 86, क्रॉस 28, बेरिंग्टन 37, लियास्क नाबाद 17, कॅम्फर 2-9, लिटल 1-30, ऍडेर 1-23), आयर्लंड 19 षटकात 4 बाद 180 (कॅम्फर नाबाद 72, डॉकरेल नाबाद 39, बलबिर्नी 14, टकेर 20, टेक्टर 14, वॅट, व्हील, शेरीफ आणि लियास्क प्रत्येकी 1 बळी).









