ज्युनियर वर्ल्ड कप नेमबाजी : रश्मिका सहगलला रौप्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड नेमबाजी स्पर्धेत भारताच्या 16 वर्षीय जोनाथन गविन अँटनीने निर्दोष प्रदर्शन करीत पुरुषांच्या 10 मी. एअर पिस्तुल प्रकाराचे सुवर्णपदक पटकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
अँटनीने पात्रता फेरीतही 586 गुण नोंदवत अव्वल स्थान घेतले होते. हाच फॉर्म त्याने अंतिम फेरीतही कायम ठेवत 24 पैकी 21 शॉट्समध्ये दहा गुण नोंदवत सुवर्ण पटकावले. तब्बल 8.5 गुणांच्या फरकाने त्याने जवळच्या प्रतिस्पर्ध्याला मागे टाकले. इटलीच्या लुका अरिघीने 236.3 गुणांसह रौप्य, स्पेनच्या लुकास सांचेझ टोमने 215.1 गुण घेत कांस्यपदक मिळविले. भारताचा अन्य एक नेमबाज चिराग शर्माला 115.6 गुणांसह आठवे स्थान मिळाले.
कनिष्ठ महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल प्रकारात वैयक्तिक त्रयस्थ अॅथलीट इव्हेलिना शिएनाने 240.9 गुण घेत सुवर्ण मिळविले. भारताच्या रश्मिका सहगलने 236.1 गुण घेत रौप्य व इराणच्या फातिमाह शेकरीने 213.8 गुण घेत कांस्यपदक मिळविले. भारताच्या वंशिका चौधरीने पाचवे, मोहिनी सिंगने सहावे स्थान मिळविल.









