वृत्तसंस्था/ दुबई
जानेवारी 2025 या महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूंची घोषणा आयसीसीने मंगळवारी केली असून विंडीजचा स्पिनर जोमेल वॉरिकन व ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी यांना सर्वोत्तम पुरुष व महिला क्रिकेटपटू म्हणून निवडले आहे.
वॉरिकनच्या भेदक डावखुऱ्या फिरकीच्या आधारावर विंडीजने 1990 नंतर पाकिस्तानमध्ये पहिला कसोटी विजय मिळविला. महिलांमध्ये बेथ मुनीच्या शानदार प्रदर्शनामुळे ऑस्ट्रेलियाने महिलांच्या अॅशेस मालिकेत इंग्लंडचा धुव्वा उडविला. भारतीय उपखंडातील संस्मरणीय कामगिरीमुळे वॉरिकनला आयसीसीचा महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान मिळाला पाकचा अनुभवी स्पिनर नोमन अली व भारताचा गूढ स्पिनर वरुण चक्रवर्ती यांनीही दर्जेदार कामगिरी केली होती. पण त्यांना मागे टाकत वॉरिकनने हा पुरस्कार मिळविला.
32 वर्षीय वॉरिकनने दोन कसोटीत 9 धावांच्या सरासरीने 19 बळी टिपले. पाकने पहिली कसोटी जिंकून आघाडी घेतली असली तरी मुल्तानच्या फिरकीस अनुकूल खेळपट्टीवर वॉरिनने दहा बळी मिळविले. त्याने पहिल्या डावात 3 तर दुसऱ्या डावात 32 धावांत 7 बळी मिळवित वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. दुसऱ्या कसोटीत त्याने फलंदाजीतही उपयुक्त योगदान दिले. 9 बाद 95 अशा स्थितीनंतर त्याने नाबाद 36 धावांची खेळी करीत विंडीजला दीडशतकी मजल मारून दिली. नंतर भेदक गोलंदाजी करीत 43 धावांत 4 व 27 धावांत 5 बळी मिळवित आपल्या संघाला 120 धावांनी पाकवर ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्याला मालिकावीरचा पुरस्कारही मिळाला. मे 2024 मध्ये विंडीजच्या गुडाकेश मोतीने महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळविला होता. त्यानंतर वॉरिकनने हा बहुमान मिळविला आहे.
बेथ मुनीचे शानदार प्रदर्शन
महिला विभागात इंग्लंडविरुद्ध झालेल्या वनडे व टी-20 अॅशेस मालिकेत बेथ मुनीने दमदार प्रदर्शन केले. अडखळत सुरुवात झाल्यानंतर मुनीने होबार्टमधील तिसऱ्या वनडेत संघर्षपूर्ण अर्धशतक नोंदवले. 4 बाद 59 अशी स्थिती असताना तिने इंग्लंडच्या माऱ्याला कडवा प्रतिकार करीत 64 चेंडूत 50 धावा करीत संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. ऑस्ट्रेलियाने 308 धावा जमवित नंतर इंग्लंडवर एकतर्फी मालिकाविजय मिळविला.
टी-20 मध्ये मुनीने फलंदाजीच्या क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राखणारी कामगिरी करताना 146.89 च्या जबरदस्त स्ट्राईकरेटवर 213 धावा तडकावल्या. तिने 75 व 44 धावांच्या खेळीनंतर अॅडलेडमध्ये 63 चेंडूत नाबाद 94 झोडपल्या. गेल्या पाच वर्षातील तिची ही या प्रकारातील सर्वोच्च धावसंख्या आहे. आयसीसी पुरस्कारासाठी तिने विंडीजची करिश्मा रामहरक व टी-20 वर्ल्ड कप जिंकणारी भारताची यू-19 खेळाडू त्रिशा गोंगाडी यांनी मागे टाकले. गेल्या डिसेंबरमध्येही ऑस्ट्रेलियाच्या अॅनाबेल सदरलँडने आयसीसीचा मासिक पुरस्कार मिळविला होता.









