वृत्तसंस्था/ मुलहेम अॅन डेर रुहेर (जर्मनी)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या जर्मन खुल्या सुपर 300 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या त्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठताना झेकच्या हॉनिकोव्हा आणि झुजाकोव्हा यांचा पराभव केला.
त्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी झेकच्या हॉर्निकोव्हा आणि झुजाकोव्हा यांचा 21-10, 21-11 अशा गेम्समध्ये पराभव करत शेवटच्या आठ जोड्यांमध्ये स्थान मिळवले. मात्र या स्पर्धेत पुरुष आणि महिलांच्या एकेरीमध्ये भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. महिलांच्या एकेरीमध्ये डेन्मार्कच्या मिया बिचफिल्डने भारताच्या आकर्षी कश्यपचा 21-13, 21-14 तर पुरुषांच्या एकेरीमध्ये आयर्लंडच्या नेगुयेनने भारताच्या सतीशकुमार करुणाकरनचा 21-18, 24-22 असा पराभव करत तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला.









