प्रतिनिधी /म्हापसा
म्हादई विषय जटील बनला असून म्हादईबाबत सरकार जनतेच्या डोळ्यात धूळफेक करीत आहे. म्हादईबाबत क्रांती घडवून आणण्यासाठी आता सर्वांनी पेटवून उठणे काळाची गरज आहे. राज्याची अस्मिता राखण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन म्हादईबाबत आवाज उठवूया यासाठी तमाम गोमंतकातील जनतेने आम्हाला साथ द्या, असे आवाहन विविध पक्षातील युवा नेत्यांनी म्हापसा येथील तार नदीच्या पात्रात एकत्रित येऊन संयुक्तरित्या म्हादईसाठी निदर्शने करीत केले. यावेळी विजय भिके, विरेंद्र शिरोडकर, प्रणव परब, मुक्तामाला शिरोडकर, राजेंद्र कोरगावकर, विश्वास नागवेकर, जितेश कामत, झायगल लोबो, रोनाल्डो रोझारिओ, जयदेव शेट्यो, अॅड. रोशन चोडणकर, मुक्तार शेख आदी उपस्थित होते.
म्हादई नदीच्या बचावासाठी आम्हाला साथ द्या- विजय भिके
आज म्हादईला वाचविले नाही तर मोठी समस्या निर्माण होईल. म्हादई नसेल तर मांडवी, तारसारख्या अन्य नदीचे पात्र प्रदूषित होणार आहे. अशी निदर्शने आम्ही प्रत्येक नदीजवळ करणार आहोत, उठा जागे व्हा. अच्छे दिन कधीच येणार नाही. नदीसाठी लोकांनी जागे रहायला पाहिजे. सरकारने फक्त आश्वासने दिली आहे, याविऊद्ध सर्व लोकांनी पेटून उठले पाहिजे. नदीसाठी आम्हाला सर्वांनी साथ द्यावी, अशी मागणी काँग्रेस नेते विजय भिके म्हणाले.
श्रीपाद नाईक यांनी पदाचा राजीनामा द्यावा- जितेश कामत
शिवसेना गोवा राज्य प्रमुख जितेश कामत म्हणाले की, आज जे आम्ही निदर्शने केली आहे ते संयुक्त निदर्शने आहेत. सध्या म्हादई नदीचे पाणी कमी झाले आहे आणि गटाराचे पाणी जास्त झाले आहे. म्हापशाचे आमदारही तोंड गप्प ठेवून बसले आहेत. खासदार श्रीपाद नाईक यांनी आपण राजीनामा देणार असे स्पष्ट केले होते. शहा स्पष्टपणे सांगतात राज्य सरकारच्या संगमताने पाणी वळविण्यात येईल त्यामुळे हा सरकार व श्रीपाद नाईकांचा पराभव आहे. म्हणून श्रीपाद नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी कामत यांनी केली.
प्रणव परब म्हणाले की, पेडणे महालात आठ – आठ दिवस पाणी येत नाही. म्हादई नदीचे पाणी बंद झाल्यास तिळारीचे पाणी आम्हाला वाटून घालावे लागणार. क्रांती घडविण्यासाठी सर्वांनी बाहेर रस्त्यावर यावे. म्हादई जिंकण्यासाठी आमदारांनीही लोकांबरोबर यावे. म्हादईसाठी सर्वांनी एकत्रित यावे, असे आवाहन त्यांनी केले.
राज्याची अस्मिता राखण्यासाठी एकत्र या : मुक्तामाला शिरोडकर
मुक्तामाला शिरोडकर म्हणाल्या की, भाजप सरकार कुणाचेच नाही त्यांना कर्नाटक पाहिजे म्हणून ते कर्नाटकाच्या बाजूने वाहतात. गोमंतकीयांनी आता राज्य सरकारला दाखवून दिले पाहिजे की, आम्ही सदैव एकत्र राहणार मग तो कोणताही विषय असो. राज्याची अस्मिता टिकवून ठेवण्यासाठी आम्ही पुढे येऊन लढा द्यायला पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
मुख्यमंत्री गप्प का? : विश्वास नागवेकर
विश्वास नागवेकर म्हणाले, म्हादई प्रश्न त्वरित सोडवायला पाहिजे. भाजप सरकार फक्त फुटाफुटीचे राजकारण करतात. लोकांची दिशाभूल करण्याचे काम सरकार करीत आहेण् असा आरोप त्यांनी केला. अमित शहाचा निषेध करायला पाहिजे. मुख्यमंत्री तोंड बंद करून बसले आहे. श्रीपाद नाईक तमाम जनतेला गाजर दाखवित आहे. त्यांचा आम्ही निषेध करीत असल्याचे ते म्हणाले.









