25 हजाराची मागणी : लोकायुक्त विभागाच्या अधिकाऱ्यांची कारवाई
बेळगाव : फायबर ग्लास तयार करणाऱ्या एका कंपनीच्या व्यवस्थापकाकडून 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना वाणिज्य कर विभागाचे सहआयुक्त द्राक्षायणी चौशेट्टी यांना लोकायुक्त अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले आहे. गुरुवार दि. 26 ऑक्टोबर रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे. लोकायुक्त पोलीसप्रमुख हणमंत राय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निरंजन पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी वाणिज्य कर विभागाच्या कार्यालयातच सहआयुक्तांना जाळ्यात अडकविले आहे. ऑटोनगर येथील विकास काम्पोझिट्स कंपनीचे व्यवस्थापक विकास प्रमोद कोकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
ही कंपनी बससाठी फायबर ग्लास तयार करते. या कंपनीकडून पुरविण्यात आलेल्या मालासंबंधी सी फॉर्म घेऊन राज्य जीएसटी विभागाकडे दाखल केले नाही, म्हणून जीएसटी विभागाकडून कंपनीला सीझर नोटीस पाठविण्यात आली होती. कंपनीकडून जीएसटीसाठी 41 हजार रुपये भरण्यात आले होते. सी फॉर्म दाखल केल्यानंतर कंपनीने जीएसटीदाखल भरलेले 41 हजार रुपये परत मिळविण्यासाठी विकास कोकणे यांनी अर्ज केला होता. वाणिज्य कर विभागाच्या सहआयुक्त द्राक्षायणी चौशेट्टी यांनी यासाठी 25 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यामुळे विकास यांनी लोकायुक्तांकडे फिर्याद दिली होती. 25 हजार रुपये लाच स्वीकारताना गुरुवारी दुपारी रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.









