किरण गावडे यांचे मत : शहापूर येथे हुतात्मा मधू बांदेकर यांना श्रद्धांजली : मराठी भाषिकांनी म. ए. समितीच्या झेंड्याखाली एकत्र येण्याची गरज
प्रतिनिधी /बेळगाव
सीमाप्रश्नाची सोडवणूक करून महाराष्ट्रात सामील होणे हे एकच ध्येय प्रत्येक मराठी भाषिकाचे आहे. स्वभाषेच्या राज्यात समाविष्ट होणे हीच खरी हुतात्म्यांना श्रद्धांजली ठरणार आहे. म. ए. समितीतील दुही संपवून आता एकत्रित येण्याची गरज आहे. पुढील निवडणुकीवर डोळा ठेवून राष्ट्रीय पक्षांकडून पैशांचे वाटप सुरू आहे. त्यामुळे स्वाभिमानी मराठी भाषिकांनी म. ए. समितीच्या भगव्या झेंड्याखाली एकत्र यावे, असे विचार शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस किरण गावडे यांनी व्यक्त केले.
कचेरी गल्ली, शहापूर येथे हुतात्मा मधू बांदेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी ते बोलत होते. हुतात्मा मधू बांदेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रद्धांजली वाहण्यात आली. ते पुढे म्हणाले, आम्ही दोनवेळा निवडणुका हरलो. परंतु यातून शिकून घेत पुढच्या निवडणुकीसाठी पुन्हा सज्ज झाले पाहिजे. मराठी भाषिकांना संपविण्याचा प्रयत्न राष्ट्रीय पक्ष करीत असून निवडणुकांच्या माध्यमातून त्यांना जशासतसे उत्तर देण्याची वेळ आली असल्याचे किरण गावडे यांनी सांगितले.
मारुती चतुर म्हणाले, बेळगावचा सीमाप्रश्न आता केंद्रस्तरावर पोहोचल्याने त्याला गती मिळाली आहे. महाराष्ट्रातील नेतेमंडळी वेळोवेळी सर्वोच्च न्यायालयातील खटल्यासाठी प्रयत्नशील आहेत. कोणत्याही मार्गाने लवकरात लवकर सीमावासियांना न्याय मिळावा व हुतात्म्यांना श्रद्धांजली मिळावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी हेमंत जांगळे, महेश जांगळे, भरत जांगळे, विजय बांदेकर, विनायक बांदेकर, सागर चौगुले, वैभव चव्हाण, भरमा जांगळे, गौतम जांगळे, सुशांत जांगळे, गजानन शहापूरकर, विष्णू जांगळे, रमेश बांदेकर, सुनील बोकडे, राजकुमार बोकडे, नारायण पाटील, राजू चतुर, माजी नगरसेवक विजय भोसले, सदा बांदेकर, महादेव जांगळे यांसह मराठी भाषिक उपस्थित होते.









