सीआयटीयू संघटनेचे कामगारवर्गाला आवाहन
बेळगाव : केंद्र व राज्य सरकारांचे कामगारविरोधी कायदे मागे घ्यावेत, यासाठी बुधवार दि. 9 जुलै रोजी सीआयटीयूने देशपातळीवरील संपाची हाक दिली आहे. या संपाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात कामगारांनी आपले काम बंद ठेवून रास्ता रोको करावा, असे आवाहन कामगार नेते जी. एम. जैनेखान यांनी केले. कन्नड साहित्य भवन येथे आयोजिलेल्या कामगारांच्या मेळाव्यात बोलताना ते पुढे म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळातही आपल्या हक्कासाठी आंदोलने छेडून अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. कामगारांना काही सुविधा मिळवून देण्यात यश आले. त्या कायद्यामुळेच सध्याच्या कामगारांना काही सोयीसुविधा मिळत आहेत.
केंद्र सरकारने 29 कायदे केवळ चार संहितेमध्ये दुरुस्ती करून कामगारांना मिळणाऱ्या सुविधा हिरावून घेण्याचा घाट घातला आहे, असा आरोपही त्यांनी केला. 9 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व कामगारांनी आपली कामे बंद ठेवून तालुका पातळीवर होणाऱ्या आंदोलनात भाग घ्यावा. केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणांचा निषेध करावा, असे आवाहन पंचायत नोकर संघटनेचे माचप्पा बजंत्री यांनी केले. कामगार कायद्यात दुरुस्ती करून कामगारांना किमान वेतनापासून वंचित ठेवण्यात येत आहे. त्यामुळे आपला याला विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अंगणवाडी नोकर संघटनेच्या तालुका अध्यक्षा मंदा नेवगी, जे. व्ही. कुलकर्णी, गोदावरी राजापुरे, सी. एस. मगदूम, यल्लाप्पा नाईक आदी उपस्थित होते.









