वृत्तसंस्था/नवी दिल्ली
क्रिकेट विंडीजचे प्रमुख कार्यकारी अधिकारी जॉनी ग्रेव्ह हे येत्या ऑक्टोबरमध्ये आपल्या सीईओपदाचा त्याग करणार आहेत. 2017 च्या फेब्रुवारीपासून ग्रेव्ह यांच्याकडे हे पद सुपूर्द करण्यात आले होते.
जॉनी ग्रेव्ह यांनी आपल्या सीईओ पदाच्या कारकिर्दीत विंडीजमध्ये अनेक प्रमुख स्पर्धा यशस्वी केल्या. 2018 साली महिलांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा, 2022 ची 19 वर्षांखालील वयोगटातील युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा त्याच प्रमाणे 2024 ची पुरूषांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जॉनी ग्रेव्ह यांच्या सीईओ पदाच्या कारकिर्दीत यशस्वी झाल्या. जॉनी ग्रेव्ह यांनी सलग तीन वर्षे विंडीजमध्ये सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महत्वाचे योगदान दिले आहे. आपण आता या पदातून मुक्त होणार असून यापुढे मी माझा कालावधी कुटुंबियांसमवेत घालविणार असल्याचे ग्रेव्ह यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. इंग्लंडमध्ये व्यावसायिक क्रिकेटपटू संघटनेचे ग्रेव्ह दहा वर्षे संचालक म्हणून होते. त्यानंतर त्यांची क्रिकेट विंडीजने सीईओपदी नियुक्ती केली. आपल्याला क्रिकेट क्षेत्रामध्ये कार्य करताना विंडीज क्रिकेट मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य दिल्याबद्दल त्यांनी मंडळाच्या सदस्यांचे आभार मानले.









