11 जानेवारीला होणार प्रदर्शित
बॉलिवूडमधील गुणी कलाकार जॉन अब्राहम स्वत:च्या बिगबजेट प्रोजेक्टसोबत प्रेक्षकांना सामोरा जाण्यास तयार आहे. अभिनेत्याने आता स्वत:चा आगामी चित्रपट ‘द डिप्लोमॅट’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. जॉनचा हा चित्रपट पुढील वर्षाच्या प्रारंभी म्हणजेच 11 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

जॉनने या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. पोस्टरमध्ये जॉनच्या व्यक्तिरेखेची झलक दिसून येते. सत्यकथेवर आधारित चित्रपटाच्या पोस्टरमध्ये ‘एका खऱ्या नायकाला कुठल्याही शस्त्राची गरज नसते’ असे नमूद आहे. चित्रपटाची निर्मिती जॉन अब्राहम, भूषण कुमार, समीर दीक्षित, अश्विन, राजेश बहल, विपुल शाह आणि कृष्णन कुमार मिळून करत आहेत. याचे दिग्दर्शन शिवम नायर यांनी केले आहे. नायर यांनी यापूर्वी ‘नाम शबाना’ आणि ‘मुखबिर’ यासारख्या चित्रपट अन् वेबसीरिजचे दिग्दर्शन केले आहे.
जॉन अब्राहम ‘द डिप्लोमॅट’सोबत ‘वेदा’ चित्रपटात दिसून येणार आहे. यात तो शर्वरी वाघसोबत झळकणार आहे. जॉन यापूर्वी ‘पठान’ या चित्रपटात दिसून आला होता. यात त्याने शाहरुख खान अन् दीपिका पदूकोनसोबत मुख्य भूमिका साकारली होती.









