इंग्लंडचा डाव 8 बाद 393 धावांर घोषित, क्रॉले, बेअरस्टो यांची अर्धशतके, लियॉनचे 4 बळी
वृत्तसंस्था/ बर्मिंगहॅम
जो रुटचे नाबाद शतक, क्रॉले व बेअरस्टो यांची अर्धशतके यांच्या जोरावर यजमान इंग्लंडने शुक्रवारी येथे अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत आपला पहिला डाव 8 बाद 393 धावांवर घोषित केला. रुट आणि बेअरस्टो यांनी 6 व्या गड्यासाठी 121 धावांची शतकी भागिदारी केली. ऑस्ट्रेलियातर्फे लियॉनने 4 तर हॅझलवूडने 2 गडी बाद केले. दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 4 षटकांत बिनबाद 14 धावा जमविल्या.
इंग्लंडने चहापानावेळी 52 षटकात 5 बाद 240 धावा जमाविल्या होत्या. चहापानानंतरच्या शेवटच्या सत्रामध्ये इंग्लंडने 3 गडी गमविताना 153 धावा जमविल्या. जो रुटने बेअरस्टोसमवेत 6 व्या गड्यासाठी 121 धावांची शतकी भागिदारी केली. बेअरस्टोने 78 चेंडूत 12 चौकारांसह 78 धावा फटकावल्या. बेअरस्टोचे हे 91 कसोटीतील 24 वे अर्धशतक आहे. बेअरस्टो बाद झाल्यानंतर मोईन अलिने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 18 तर स्टुअर्ट ब्रॉडने 2 चौकारांसह 16 धावा केल्या. रॉबिन्सन आणि रुट यांनी शेवटच्या काही षटकात फटकेबाजी केली. रुटने 152 चेंडूत 4 षटकार आणि 7 चौकारांसह नाबाद 118 तर रॉबिन्सनने 31 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 16 धावा जमविल्या. या जोडीने 9 व्या गड्यासाठी अभेद्य 43 धावांची भर घातली. जो रुटचे कसोटीतील हे 30 वे शतक असून 2015 नंतर रुटचे ऑस्ट्रेलियाविरुद्धचे हे पहिले शतक आहे. इंग्लंडतर्फे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके नोंदविणाऱ्या फलंदाजांमध्ये रुट दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. रुटने 131 कसोटीत 30 शतके झळकाविली आहेत. तर इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूक 161 कसोटीत 33 शतकांसह पहिल्या स्थानावर आहे.
क्रॉलेचे अर्धशतक
या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध आणि भेदक गोलंदाजी करत इंग्लंड संघावर बरेच दडपण आणले होते. क्रॉले आणि डकेट यांनी इंग्लंडच्या डावाला सुरुवात केली आणि चौथ्या षटकात वेगवान गोलंदाज हॅझलवूडने डकेटला यष्टीरक्षक कॅरेकरवी झेलबाद केले. त्याने 2 चौकारांसह 12 धावा जमविल्या. क्रॉले आणि पॉप या जोडीने सावधपणे फलंदाजी केली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागिदारी 65 चेंडूत नोंदविली. क्रॉलेने आपले अर्धशतक 56 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने झळकाविले. ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज लिऑनने इंग्लंडला उपाहारापूर्वीच पहिला धक्का दिला. लियॉनच्या चेंडूवर स्विपचा फटका मारण्याच्या नादात पोप पायचीत झाला. त्याने 44 चेंडूत 2 चौकारांसह 31 धावा जमविताना क्रॉले समवेत दुसऱ्या गड्यासाठी 70 धावांची भागिदारी केली. उपारापूर्वी इंग्लंडचे शतक 122 चेंडूत फलकावर लागले. उपाहाराला केवळ काही मिनिटे बाकी असताना बोलँडने क्रॉलेला कॅरेकरवी झेलबाद केले. क्रॉलेने 73 चेंडूत 7 चौकारांसह 61 धावा जमविल्या. क्रॉले बाद झाल्यानंतर पंचांनी उपाहारासाठी खेळ थांबविला. त्यावेळी इंग्लंडची स्थिती 26.4 षटकात 3 बाद 124 अशी होती. रुट 20 धावावर खेळत होता.
खेळाच्या दुसऱ्या सत्राला प्रारंभ झाल्यानंतर रुट आणि ब्रूक यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज टिच्चून गोलंदाजी करत असल्याने इंग्लंडच्या फलंदाजांना फटकेबाजी करता आली नाही. ब्रूक आणि रुट यांनी चौथ्या गड्यासाठी 51 धावांची भागिदारी केली. लियॉनच्या फसव्या चेंडूवर ब्रूकचा त्रिफळा उडाला. त्याने 37 चेंडूत 4 चौकारांसह 32 धावा जमविल्या. कर्णधार स्टोक्सचे मैदानात आगमन झाले पण तो केवळ 8 चेंडू खेळू शकला. हॅझलवूडच्या स्विंग गोलंदाजीवर कर्णधार स्टोक्स कॅरेकडे झेल देऊन तंबूत परतला. त्याने केवळ 1 धावा जमवून स्टोक्स लवकर बाद झाल्याने इंग्लंडवर अधिकच दडपण आले. इंग्लंडचा निम्मा संघ 176 धावात तंबूत परतला होता. दरम्यान रुटने बेअरस्टोला साथीला घेत चहापानापर्यंत संघाची अधिक पडझड होऊ दिली नाही. चहापानावेळी इंग्लंडने 52 षटकात 5 बाद 240 धावा जमविल्या होत्या. रुटने आपले अर्धशतक 74 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने नोंदविले. तर इंग्लंडचे द्विशतक 43.4 षटकात फलकावर लागले. बेअरस्टो आणि रुट यांनी सहाव्या गड्यासाठी अभेद्य 64 धावांची भागिदारी केली होती. चहापानावेळी रुट 7 चौकारांसह 66 तर बेअरस्टो 4 चौकारांसह 33 धावांवर खेळत होते. ऑस्ट्रेलियातर्फे हॅझलवूड आणि लियॉन यांनी प्रत्येकी 2 तर बोलँडने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – इंग्लंड प. डाव : 78 षटकात 8 बाद 393 डाव घोषित (क्रॉले 7 चौकारांसह 61, डकेट 2 चौकारांसह 12, पोप 2 चौकारांसह 31, रुट 152 चेंडूत 4 षटकार आणि 7 चौकारांसह नाबाद 118, ब्रूक 4 चौकारांसह 32, स्टोक्स 1, बेअरस्टो 78 चेंडूत 12 चौकारांसह 78, मोईन अली 18, ब्रॉड 16, रॉबिन्सन नाबाद 17, अवांतर 9, हॅझलवूड 2-61, लियॉन 4-149, बोलँड 1-86, ग्रीन 1-32. ऑस्ट्रेलिया पहिला डाव 4 षटकांत बिनबाद 14 : वॉर्नर खेळत आहे 8, उस्मान ख्वाजा खेळत आहे 4, अवांतर 2.