वृत्तसंस्था/ दुबई
भारताचा प्रमुख ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या ‘आयसीसी’ कसोटी क्रमवारीत गोलंदाजांमध्ये अव्वल स्थान कायम राखले आहे, तर इंग्लंडच्या ज्यो रूटने जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज ठरताना ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेनला मागे टाकले आहे.
या महिन्याच्या सुऊवातीला लंडनमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात संधी मिळालेली नसली, तरी अश्विन 860 गुणांसह जगातील अग्रकमांकाचा गोलंदाज राहिला आहे. त्यानंतर इंग्लंडचा जेम्स अँडरसन 829 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारतीय गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह (772) आणि रवींद्र जडेजा (765) यांच्या क्रमवारीत कोणताही बदल न होता ते अनुक्रमे आठव्या आणि नवव्या स्थानावर आहेत.
भारताच्या फलंदाजीचा मुख्य आधार विराट कोहली एका स्थानाने खाली घसरून 14 व्या स्थानावर आला आहे, तर कर्णधार रोहित शर्मा 12 व्या स्थानावर आहे. चेतेश्वर पुजारा 25 व्या स्थानावर, तर अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर अनुक्रमे 36 व्या आणि 37 व्या स्थानावर आहेत. यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत हा एकमेव भारतीय खेळाडू आहे ज्याने अव्वल दहामध्ये स्थान मिळविले आहे. त्याला दहावे स्थान मिळालेले आहे.
फलंदाजांच्या क्रमवारीत रूटने पाच स्थानांची झेप घेत लाबुशेनला मागे टाकून आघाडीचे स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीत इंग्लंडला दोन गडी राखून पराभूत करून सध्या चालू असलेल्या अॅशेस मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतल्यानंतर क्रमवारीत बदल झाला आहे. या कसोटीत ऊटने नाबाद 118 आणि 46 धावांची खेळी केली. या उत्कृष्ट वैयक्तिक प्रयत्नांमुळे त्याला इतकी मोठी झेप घेतला आली आहे. लाबुशेन मात्र दोन्ही डावांत छाप पाडू शकला नाही. त्याला इंग्लंडविऊद्ध पहिल्या डावात खातेही उघडता आले नाही आणि दुसऱ्या डावात अवघ्या 13 धावा काढता आल्या. परिणामी लाबुशेन तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे, तर न्यूझीलंडचा अनुभवी केन विल्यमसन दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.









