वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सध्या कर्करोगाने ग्रस्त आहेत. 82 वर्षीय बायडेन यांना प्रोस्टेट कर्करोग झाला असून, तो त्यांच्या हाडांमध्ये पसरला आहे. तथापि, हा कर्करोग हार्मोन-संवेदनशील असला तरी तो नियंत्रित केला जाऊ शकतो, असा विश्वास वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो बायडेन यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच बायडेन यांच्या प्रकृतीबद्दल अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही बायडेन यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय, कमला हॅरिस यांनीही बायडेन लवकर तंदुरुस्त होवोत, असे म्हटले आहे.









