मुरगोड पोलिसांची कारवाई : दागिने जप्त

प्रतिनिधी /बेळगाव
ग्रामीण भागातील मंदिरांना लक्ष्य बनवून मूर्तींवरील सोन्या-चांदीचे दागिने पळविणाऱ्या जोडगोळीला मुरगोड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून सुमारे 1 लाख 30 हजार 500 रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी ही माहिती दिली आहे. रामदुर्गचे पोलीस उपअधीक्षक रामनगौडा हट्टी, पोलीस निरीक्षक मौनेश्वर माली-पाटील, उपनिरीक्षक आय. एम. हिरेगौडर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली असून दोन मंदिरातील चोऱ्यांची त्यांनी कबुली दिली आहे.
गंगाप्पा चन्नाप्पा देवलापूर, निंगाप्पा रुद्राप्पा थोली, दोघेही राहणार मुतवाड अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. मुतवाड येथील हनुमान मंदिर व मुगळीहाळ येथील श्री लक्ष्मी मंदिरात चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. हनुमान मंदिरात असलेल्या द्यामव्वा देवी व दुर्गादेवी मूर्तींच्या गळ्यातील प्रत्येकी अडीच ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, 250 ग्रॅम चांदीचा मुखवटा चोरला होता.
मुगळीहाळ येथील श्री लक्ष्मीदेवी मंदिरातून 400 ग्रॅम चांदीच्या काठ्या, 100 ग्रॅम चांदीचा हात, 2 ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, 2 ग्रॅमची नथ चोरण्यात आली होती. हे सर्व दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. या जोडगोळीने आणखी कोणत्या मंदिरात चोरी केली आहे का? याचा तपास करण्यात येत आहे.









