रोजगारमंत्री बाबुश मोन्सेरात यांचा दावा
प्रतिनिधी /पणजी
रोजगार विनिमय केंद्रातील बेरोजगारांच्या आकडेवारीवर लोकांनी विसंबून राहू नये, कारण केवळ सरकारी नोकरी म्हणजेच रोजगार असा समज करून घेतलेल्या लोकांना या केंद्रातील आकडेवारीवरून राज्यात प्रचंड बेरोजगारी असल्यासारखे वाटते, परंतु ते सत्य नाही. या केंद्रात नोंदणीकृत असलेल्यापैकी किमान 80 टक्के उमेदवार हे कोणत्या ना कोणत्या खाजगी आस्थापनात काम करत असतात, असा दावा श्रम आणि रोजगारमंत्री बाबुश मॉन्सेरात यांनी केला आहे.
पणजीचे आमदार या नात्याने मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत ते बोलत होते. मनपा इमारतीत झालेल्या या बैठकीस महापौर रोहित मोन्सेरात यांच्यासह अन्य नगरसेवक उपस्थित होते.
खासगी नोकरी करणाऱयांची नोंद नाही
रोजगार विनिमय केंद्र खाजगी क्षेत्रात काम करणाऱयांची नोंद ठेवत नाही. तेथे केवळ सरकारी नोकरी मिळालेल्यांचीच नोंद ठेवण्यात येते. विधानसभा अधिवेशनात सादर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात सुमारे 1.16 लाख बेरोजगार असल्याची नोंद असली तरी प्रत्यक्षात त्यातील किमान 90 हजार उमेदवार खाजगी क्षेत्रात काम करतात. यापुढे अशा उमेदवारांचीही माहिती मिळविण्याचे प्रयत्न सरकार करेल. त्याद्वारे बेरोजगारांची नक्की आकडेवारी स्पष्ट होईल, असे मोन्सेरात म्हणाले.
लोकांना केवळ सरकारी नोकरी म्हणजे रोजगार मिळाल्यासारखे वाटते. परंतु सरकारची भूमिका केवळ सरकारी नोकरीची हमी देण्यापुरती मर्यादित नाही. खाजगी क्षेत्रातही नोकऱया निर्माण करण्यासाठी उद्योगांना आमंत्रित करणे याचाही त्यात समावेश आहे. स्टार्टअप हा रोजगाराचा दुसरा पर्याय आहे, असे ते पुढे म्हणाले.
या बैठकीत रोजगार विषयासह राजधानीतील रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, सांडपाणी, वाहतूक, बंदर कप्तान, पर्यटन, पूल यासारख्या अन्य विषयांवर विविध मान्यवरांशी चर्चा केली. स्मार्ट सिटी, गोवा पर्यटन विकास महामंडळ, आरोग्य, जलस्रोत, वीज, सुडा, आदी खाती, महामंडळे आणि संस्थांचे उच्च अधिकारी त्यावेळी उपस्थित होते.









