50 हून अधिक कंपन्यांचा सहभाग : 4 हजार नोकऱ्या देण्याचा प्रयत्न
बेळगाव : बेळगावमधील तरुणांना रोजगाराची संधी मिळावी, या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव यांच्यावतीने शनिवार दि. 17 जून रोजी नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत बी. के. कॉलेज (ज्योती महाविद्यालय) येथे रोजगार मेळावा होईल. बेंगळूर येथील स्पेक्ट्रम टॅलेंट मॅनेजमेंट लिमिटेड यांच्या सहयोगाने रोजगार मेळावा होणार असून यामध्ये पुणे, मुंबई, बेंगळूर येथील 50 हून अधिक कंपन्या सहभागी होणार आहेत. अंदाजे 4 हजार विद्यार्थ्यांना नोकरी देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे सदस्य डी. बी. पाटील यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. बेळगावमधील विद्यार्थ्यांना नोकरीच्या शोधासाठी बेंगळूर, पुणे, मुंबई येथे जावे लागते. यामध्ये वेळ व पैसा वाया तर जातोच, त्याचबरोबर अनेक वेळा फसवणूकही होते. याचा विचार करून रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगावने रोटरी रोजगार मेळावा-2023 हा उपक्रम आयोजित केला आहे. दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी, इंजिनिअरिंग उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होईल, अशा कंपन्यांची निवड करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष उमेश रामगुरवाडी यांनी दिली. रोजगार मेळाव्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन नावनोंदणी करता येईल. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क अथवा प्लेसमेंट फी आकारली जाणार नाही. अधिक माहितीसाठी 8618658961 या क्रमांकावर संपर्क साधावा. कॉर्पोरेट, ई-कॉमर्स, फार्मा, स्टार्टअप, हॉस्पिटॅलिटी, टेक्स्टाईल, रिटेल, बँक अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूट, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाईल, बीपीओ, ट्रॅव्हल अँड टुरिझम, हेल्थकेअर या क्षेत्रातील कंपन्यांचा मेळाव्यामध्ये सहभाग असल्याचे शिवानंद पाटील यांनी सांगितले. यावेळी विजयकुमार पाटील, निखिल चौगुले, विजयकुमार के. यासह इतर सदस्य उपस्थित होते.









