सिद्धिविनायक सार्वजनिक ट्रस्टकडून माहिती
प्रतिनिधी /फातोर्डा
घोगळ हाऊसिंग बोर्डमधील श्री सिद्धिविनायक सार्वजनिक ट्रस्ट, भारतीय उद्योग महासंघ आणि मॉडेल करिअर केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळावा शनिवार दि. 28 रोजी सकाळी 9.30 ते दु. 3 या वेळेत ट्रस्टच्या मंदिराच्या प्रांगणात घेण्यात येईल. त्यापूर्वी 9 ते 9.30 पर्यंत नावनोंदणी केली जाईल. मेळाव्यात बारा नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून जवळजवळ 80 पेक्षा जास्त नोकऱयांची संधी या मेळाव्यातून सहभागी युवकांना मिळणार आहे, असे सांगण्यात आले आहे.
सध्या सगळीकडे बेरोजगारीची समस्या आहे. यावर उपाययोजना म्हणून हा प्रयत्न करण्यात आला आहे. इतर देवस्थान समित्यांनीही असा प्रयत्न करावा, असे ट्रस्टचे अध्यक्ष रमेश देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी सचिव अभिजित सावंत, प्रकल्प प्रभारी पांडुरंग नाईक उपस्थित होते. फातोर्डा, मडगाव, नावेली, कुडतरीमधील युवकांना रोजगाराची संधी मिळावी, हा यामागचा हेतू आहे. रोजगाराच्या बाबतीत सरकारला मदत करण्याचा हा प्रयत्न आहे, असे सावंत यांनी सांगितले.
या मेळाव्याचा सेल्स, विमा, बँकिंग, माहिती तंत्रज्ञान, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रोबोटिक्स, बीफार्म, वैद्यकीय, आदरतिथ्य, नर्सिंग, संगणक साहाय्यक व डिझायनिंग अभियंता, थ्री-डी डिझाईन अभियंता, बीकॉम, बीएस्सी, बीए यासारख्या क्षेत्रांतील शिक्षण घेतलेल्यांनी लाभ घ्यावा, असेही यावेळी सांगण्यात आले. नावनोंदणी ऑनलाईन पद्धतीने तसेच ऑफलाईन पद्धतीने फोन करून करता येते. आतापर्यंत ऑनलाईन 70 व ऑफलाईन 80 अशी 150 नावे नोंद झाल्याचे सावंत यांनी सांगितले. पांडुरंग नाईक यांनी सांगितले की, बेरोजगार युवकांमध्ये जागृती करण्यासाठी हा उपक्रम आहे. यापुढे उद्योगधंद्यांसाठी अशा प्रकारचे प्रकल्प राबविण्याचा या ट्रस्टचा विचार आहे, असे त्यांनी सांगितले.









